ब्लॅक एलियन असे संबोधितात लोक
पूर्वी लोक स्वतःची कार, बाइक्सला मॉडिफाय करायचे. परंतु आता लोक स्वतःवरही प्रयोग करू लागले आहेत. बॉडी मॉडिफिकेशन याचाच एक हिस्सा आहे. अनेक लोकांनी सर्व मर्यादा ओलांडून बॉडी मॉडिफिकेशन करविले आहे. अशाच एका व्यक्तीने स्वतःच्या पूर्ण शरीरावर टॅटूच टॅटू काढून घेतले आहेत. परंतु या टॅटूंमुळे त्याला नोकरी मिळविणे अवघड ठरत आहे.
या व्यक्तीचे नाव अँथोनी लोर्फ्फेडो असून त्याने स्वतःच्या पूर्ण शरीरावर टॅटूच टॅटू काढून घेतले आहेत. स्वतःच्या डोळय़ांमध्येही त्याने टॅटू काढून घेतले आहेत. याचमुळे लोक त्याला ब्लॅक एलियन या नावाने देखील ओळखतात. एवढेच नव्हे तर त्याने शरीराच्या काही अवयवांना कापून घेतले आहे. नाकाचा काही हिस्सा आणि दोन्ही कानही कापून घेतले आहेत.

या टॅटूंमुळे आता नोकरी मिळत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. टॅटूंमुळे लोकांचे माझ्याबद्दल मत अत्यंत नकारात्मक आहे. एकप्रकारे दररोज या मुद्दय़ाशी संघर्ष करत आहे. दररोज नोकरीसाठी नव्या लोकांना भेटतो आणि लोक माझे म्हणणे समजून घेत नाहीत. मी स्वतः सर्वसामान्य लोकांच्या जीवनाबद्दल जाणत नाही. तसेच काही लोक माझ्याबद्दल जाणत नसल्याचे अँथोनीचे म्हणणे आहे. मी देखील माणूस आहे. जगातील अनेक लोक क्रेझी असतात. मला पाहून संतापणारे, पळ काढणारे लोक देखील आहेत. हे लोक मला क्रेझी मानत असल्याचे त्याने म्हटले आहे.
जेव्हा मी लहान मुले आणि वृद्धांना पाहतो, तेव्हा त्यांच्यापासून दूर जातो, जेणेकरून त्यांनी मला पाहून घाबरू नये. मी देखील एक माणूस आहे. मी देखील काम करू इच्छितो. माझे देखील कुटुंब असल्याचे अँथोनीचे सांगणे आहे. अँथोनीने यावरून स्वतःचे दुःख लोकांसमोर इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहे. अँथोनीला 10 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.









