बेळगाव : इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन सचिवपदी हिरल शाह यांची नियुक्ती झाली असून फेडरेशनच्या इतिहासात एखाद्या महिलेकडे सचिवपदाची धुरा सोपवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंदोरमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाली, त्यात अजित सिद्दण्णावर आयोजन समिती सचिवपदी निवडून आले आहेत. दिल्लीचे अरविंद मधोक अध्यक्ष तर अतिन तिवारी फेडरेशनचे खजिनदार असणार आहेत.
इंदोरमधील हॉटेल सयाजी येथे घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी कुमार त्रिपाठी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. फेडरेशनचे 44 सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. दिल्लीचे अरविंद मधोक (अध्यक्ष), मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डेग्रा (व्यवस्थापकीय उपाध्यक्ष), स्वामी रमेश कुमार, सुरेंद्र शर्मा, टी. व्ही. पुली (उपाध्यक्ष) आदींच्या निवडीवर येथे शिक्कामोर्तब झाले.