प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी गोव्यात पोहोचले. ते आज वेंगुर्ला येथे बॅ. नाथ पै यांच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी गोव्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांबरोबर बैठक घेतली. तर सायंकाळी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
दोन्ही नेत्यांदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी आपण शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचे नमूद केले. दै. ‘तरुण भारत’शी बोलताना विजय सरदेसाई यांनी शरद पवारांबरोबर आपण चर्चा केल्याने ज्या काही अफवा पसरविण्यात आल्या त्यात काहीही अर्थ नाही. देशाच्या राजकारणात विशेषतः विरोधी पक्षामधील एक मोठा नेता अशी शरद पवार यांची ख्याती आहे. आपले त्यांच्याशी कोणतेही काम नव्हते. परंतु ते गोव्यात आल्याने सहज त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आमची चर्चा ही राज्याच्या व राष्ट्रीय राजकारणावर होती. देशाच्या राजकारणात होत असलेले बदल व विरोधी पक्षांची भूमिका या विषयावर आम्ही चर्चा केली, असे विजय सरदेसाई म्हणाले.
मी काँग्रेसकडे भीक का मागायची?
काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच उदभवत नव्हता आणि युरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेता केला म्हणून आपले काही नुकसान होणारे नाही. उलटपक्षी मी त्यांना शुभेच्छा देतो व आपण काँग्रेस पक्षात गोवा फॉरवर्ड विलिनीकरण करुन केवळ ते पद प्राप्त करण्यासाठी धडपडणारा नाही. काँग्रेसची स्थिती आता दिवसेंदिवस अत्यंत खराब झालेली आहे. अशा पडत्या पक्षाकडे आपण कशाला जाणार? असा प्रतिसवाल त्यांनी एका प्रश्नाला केला.