वार्ताहर / वाठार किरोली :
महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी दिली जाणार आहे. विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 11 वाजता डॉ. नानासाहेब पवार सभागृहात 35 व्या पदवीदान समारंभात शरद पवार, नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ कृषी विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभाग्रहामध्ये ऑनलाईन पध्दतीने होत आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असतील. उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्रसिंह राठोड दीक्षांत भाषण करणार आहेत. पदवीदान समारंभांत प्रतिकुलपती कृषीमंत्री दादाजी भुसे मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी विद्यापीठ कार्यकारी व विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.