ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज संध्याकाळी 4 वाजता 15 पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण नाही आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. राष्ट्रमंचचे नेते त्यांच्याकडे काही सल्ल्यासाठी गेले असतील. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. नक्कीच ते मोदी विरोधी असतील. पण याचा अर्थ असा नाही की तिसरी आघाडी, चौथी आघाडी स्थापन होत आहे.
तुम्हाला कुणी सांगितले ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचे महत्त्व वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, शरद पवार यांची राष्ट्र मंचसोबत होत असलेली बैठक ही प्रबळ विरोध पक्ष तयार करण्याची पहिली पायरी असू शकते. आजची बैठक युपीएविरोधात नाही आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.