ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर आज अर्धा तास बैठक झाली. सोमवारीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक झाली होती. मात्र, त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे त्यांना राजकीय संवाद साधता आला नव्हता. त्यामुळे आज ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा समेमिरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या रोज कोणत्या ना कोणत्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बैठकीवेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना बारामतीमधील इनोवेशन सायंटिफिक रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या उदघाटन सोहळय़ाचे निमंत्रण दिले आहे.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत अवजड वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी अवजड वाहनांवरील वाहतूक कर कमी करण्यासंदर्भात तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानबाबत शेतकऱयांना मदत आणि कोविड निर्बंध हटविण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती.









