ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानाची सुरक्षा 20 तारखेपासून हटविण्यात आल्याची माहिती शरद पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यात शरद पवारांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात येते. यामध्ये दिल्ली पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांचा समावेश असतो. शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानाबाहेर 3 पोलीस अधिकारी आणि सीआरपीएफचे 3 जवान हटवण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्व कल्पना न देता शरद पवारांसह 40 जणांची सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली आहे. 20 तारखेपासून हे कर्मचारी कामावर येणे बंद झाले आहे.
सत्तांतरानंतर ही सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे सुडाचे राजकारण असून, अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था हटवल्याने शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत, का असा सवाल भाजपला केला आहे.









