मुंबई/ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत.
नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, डॉ. अमित मायदेव यांनी काल (गुरुवार) संध्याकाळी सात वाजता शरद पवार यांची तपासणी केली. आता त्यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील काल सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली होती. यामध्ये शरद पवार वृत्तपत्र वाचताना दिसत होते.
शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही.