प्रतिनिधी / शिरोळ
शेतकरी नेते शरद जोशी यांचे नाव घेवून जोगवा मागणाऱ्यांनी पहिल्यांदा बाजार समित्या व दलाली या विषयी त्यांचे काय मत होते ते समजून घ्यावे. शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करू नये. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टिकोनातून केलेले तीन कायदे मोलाचे व शेतकऱ्यांना समृद्ध करणारे आहेत कायद्याचा अभ्यास न करता मांडली जाणारी मते विरोधाभास निर्माण करणारी आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिरोळ येथील आत्मनिर्भर यात्रेदरम्यान बोलताना केले.
याच वेळी शिरोळ हे चळवळीचे माहेर घर आहे इथे जे पेरले जाते ते राज्यात उगवते मी या मातीशी आज आखेर घट्ट बांधून राहिलो आहे इथले शेतकरी भुल थापांना बळी पडता नाहीत त्यामुळे कृषी कायद्याविरोधात बंड करणाऱ्यांनी पहिल्यांदा स्वतःला तपासून घ्यावे असा टोला खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयक समर्थनार्थ गुरुवारी ( दि.24) रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यात आली. यावेळी मंत्री खोत बोलत होते. रात्री उशिरा आठ वाजता आलेल्या समर्थन रॅलीत गोपीचंद पडळकर व पृथ्वीराज यादव यांनी विधेयक समर्थनार्थ मनोगत व्यक्त केले.
स्वतःला शेतकर्यांचे नेते म्हणवून घेणारे नेते शेतकऱ्यांना खड्ड्यात घालत चालले आहेत. आता पर्यंतच्या उत्पादित शेतीमाल आणि मिळालेला भाव याबाबतीत खोलवर विचार केला तर बाजार समित्या व दलालांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. उत्पादित मालाला भाव नाही माल परत आणण्यासाठी भाड्याला पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी मिळेल त्याा किंमतीला आपला माल विकला. सातत्याने कमी दरात माल विकल्याने शेतकरी रस्त्यावर आले.
कर्जबाजारी होऊन आत्महत्याचे चक्र सुरू झाले याला सर्वस्वी काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोप खोत यांनी केला. शरद जोशी यांनी या समित्यांना कत्तलखाण्याची उपमा दिली होती. जादा उत्पन्नातून कर्जे फिटेनात म्हणून सावकारी कर्ज आणि त्यातून आत्महत्याचे चक्र फिरू लागले. शेतकऱ्यांच्या आर्थिक डबघाईला दलाल व समित्याच जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ही साखळी तोडून शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिले आहे.कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य, करार शेती, आवश्यक वस्तू सुधारणा हे तीन कायदे शेतकरी हिताचे असल्याचे खोत यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक सर्वश्री श्रीवर्धन माने डॉ अरविंद माने देशमुख इमरान आत्तार पंडित काळे माजी सरपंच गजानन संकपाळ विजय आरगे शहाजी गावडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.









