यंदाच्या विश्वचषकातील पहिलाच सामना खेळणाऱ्या शमीने 54 धावांत 5 बळी घेत किवीज संघाला जोरदार धक्के दिले. यादरम्यान, आठव्या षटकांत त्याने विल यंगला बाद करत सामन्यातील पहिला बळी मिळवला. यासह शमी विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. शमीने भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला मागे टाकले. कुंबळेने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी 31 विकेट घेतल्या होत्या. आता शमीच्या नावावर 36 विकेट्स झाल्या आहेत. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवागल श्रीनाथच्या नावावर आहे. श्रीनाथ यांनी 44 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खान दुसऱ्या स्थानावर असून त्याने 44 बळी मिळवले आहेत. या यादीत शमी आता 36 बळीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय, शमीने वर्ल्डकपमधील एका सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. या बाबतीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. शमीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरची बरोबरी केली. आता फक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याच्या पुढे आहे. असे त्याने सहा वेळा केले आहे. भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये दोनवेळा 5 विकेट्स घेणारा शमी हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून एका सामन्यात कपिल देव, रॉबिन सिंग, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा व युवराज सिंग यांनी याआधी पाच बळी घेतले आहेत.
रचिन-मिचेलचा दीडशतकी धमाका
धरमशाला येथे भारताविरुद्ध लढतीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 152 चेंडूत 159 धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे, विश्वचषकात भारताविरुद्धची एकूण सहावी मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सर्वोच्च भागीदारी रचण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डेमियन मार्टिन आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर होता. त्यांनी 2003 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध नाबाद 234 धावांची भागीदारी रचली होती.
विश्वचषकात भारताविरुद्ध सर्वोच्च भागीदारी
234- डॅमियन मार्टिन आणि रिकी पाँटिंग (2003)
182 – अॅरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ (2015)
176 – डेनिस एमिस आणि कीथ फ्लेचर (1975)
170 – इयान बेल आणि अँड्यू स्ट्रॉस (2011)
160 – जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय (2019)
159 – रचिन रवींद्र आणि डॅरील मिचेल (2023)