वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातचे माजी डीजीपी शबीर हुसेन शेखादम खांडवावाला यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटच्या (एसीयू) प्रमुखपदाची सूत्रे अजित सिंग यांच्याकडून स्वीकारली आहेत.
अजित सिंग राजस्थानचे माजी डीजीपी होते. त्यांनी बीसीसीआयच्या एसीयूच्या अध्यक्षपदाची सूत्रे एप्रिल 2018 मध्ये स्वीकारली होती. त्यांची मुदत 31 मार्च रोजी समाप्त झाल्याने शबीर हुसेन खांडवावाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शबीर यांच्याकडे सूत्रे असली तरी ते या पदावर स्थिरावेपर्यंत त्यांच्या मदतीसाठी काही काळ सोबत राहणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. 1973 बॅचचे आयपीएस ऑफिसर असलेल्या खांडवावाला यांची आयपीएल सुरू होण्याआधीच नियुक्ती करण्यात आली आहे. 9 एप्रिलपासून यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे.
‘बीसीसीआयशी निगडित होता आले, हा माझा मोठा सन्मानच आहे. बीसीसीआय ही क्रिकेट प्रशासनातील जगातील सर्वोत्तम संघटना आहे. सुरक्षिततेसंदर्भातील अनुभवाचा या कामासाठी उपयोग होणारच आहे, पण मलाही क्रिकेट आवडत असल्याने या पदावर काम करताना मला मदतच होणार आहे,’ असे 70 वर्षीय खांडवावाला म्हणाले. ‘मावळत्या अध्यक्षांनीही उत्तम कामगिरी बजावली असून भारतीय क्रिकेटची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो,’ असेही ते म्हणाले.
खांडवावाला गुजरातचे डीजीपी म्हणून डिसेंबर 2010 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एस्सार गुपचे सल्लागार म्हणून दहा वर्षे काम केले. याशिवाय केंद्र सरकारच्या लोकपाल सर्च कमिटीचेही ते सदस्य होते. या समितीद्वारे लोकपालांची नियुक्ती करण्यात येते. यावेळी एसीयू अध्यक्षपदासाठी बीसीसीआयने अर्ज न मागवता थेट नियुक्ती केली आहे. नवे एसीयू अध्यक्ष बुधवारी चेन्नईकडे प्रयाण करणार आहेत. गेल्या महिन्यात भारत व इंग्लंड यांच्यात झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यासाठीही ते उपस्थित राहिले होते. मंडळाच्या कारभाराची थोडीफार माहिती करून घेण्याच्या हेतूने ते या सामन्यात उपस्थित राहिले होते.









