वाहतूक कोंडीचा विद्यार्थी, पालक वर्गावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
सोमवारी होणाऱया शपथविधी सोहळय़ामुळे कुजिरा परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी व पालक वर्गावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नव्या मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा सोमवारी दि. 28 मार्च रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे होणार असून त्यासाठी सुमारे 10 ते 15 हजार नागरिक या सोहळय़ाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटाही तिथे तैनात असणार आहे. सर्व वाहतूकही प्रामुख्याने पणजी वास्को रस्त्यावरून पुढे जाणार असल्याने वाहतुकीची प्रचंड केंडी उद्भवण्याची भीती आहे. त्यातच कुजिरा येथे सुमारे 6 ते 7 शाळा व धेंपे महाविद्यालय अशा संस्था असून दररोज त्या परिसरात किमान तीन हजार वाहने सकाळच्यावेळी येणार आहेत व दुपारी शाळा सुटल्यावर ही वाहने पुन्हा महामार्गावर येतील. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेते येणार असल्याने नागरिकांना सकाळी लवकर येऊन तिथे आसन ग्रहण करावयाचे आहे. कार्यक्रम आटोपल्यानतंर पुन्हा वाहतुकीची प्रचंड केंडी होणार हे लक्षात घेऊन विद्यार्थी व पालक वर्गावर परिणाम होऊ नये, यासाठी या शैक्षणिक संस्था त्या दिवशी बंद ठेवणेच योग्य होईल. ज्या मुलांच्या प्रीलिम्स व इतर तत्सम परीक्षा शैक्षणिक संस्थांतर्फे घेतल्या जाणार आहेत त्या एकतर ऑनलाईन घेण्यात याव्यात किंवा दुसऱया दिवशी घेण्यात याव्यात. अन्यथा प्रचंड गेंधळात विद्यार्थीवर्ग वेळेवर शाळेत पोहोचणार नाहीत व वेळेवर घरी पोहोचणार नाहीत व वाहतुकीत अकारण भर पडणार आहे. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.








