20 रोजी जो बायडेन अध्यक्ष होणार : चर्चांना वेग
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
20 जानेवारी रोजी जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प देश सोडून जाऊ शकतात, अशी चर्चा अमेरिकेत सुरू आहे. स्कॉटलंड येथे जाण्याची योजना ट्रम्प आखत असल्याचे समजते. निवडणुकीतील पराभव पचवता न आलेले ट्रम्प सातत्याने निकालाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. 19 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्याकरता वापरले जाणारे अमेरिकेच्या सैन्याचे विमान स्कॉटलंडमध्ये उतरण्याची सूचना देण्यात आल्याने विविध कयास व्यक्त होत आहेत.
स्कॉटलंडच्या प्रेस्टविक विमानतळाला अमेरिकेच्या सैन्याचे बोइंग 757 विमान 19 जानेवारी रोजी उतरणार असल्याचे कळविण्यात आले आहे. बायडेन अध्यक्ष होण्यापूर्वीच ट्रम्प स्कॉटलंड येथे पोहोचण्याच्या चर्चेला आता बळ मिळाले आहे.
स्कॉटलंडमध्ये गोल्फ रिजॉर्ट
बायडेन यांच्या शपथविधीच्या दिनीच ट्रम्प 2024 ची निवडणूक लढविण्याची घोषणा करू शकतात. शपथविधी सोहळय़ात ट्रम्प भाग घेणार नाहीत. तसेच बायडेन यांना व्हाइट हाउसमध्ये आमंत्रित करण्याची त्यांची योजना नाही. स्कॉटलंडमध्ये ट्रम्प यांचा गोल्फ रिजॉर्ट देखील आहे.









