प्रतिनिधी/ बेळगाव
रुग्णाला कधीही रक्ताची गरज भासू शकते. त्यामुळे रक्त संकलित असणे महत्त्वाचे आहे. यासाठीच रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले पाहिजे. श्री शनैश्चर मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करते, हे स्वागतार्ह आहे. परंतु आता असलेला अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी ब्लड बँक सुरू करावी, अशी अपेक्षा हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी व्यक्त केली.
श्री शनैश्चर एज्युकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे श्री शनैश्चर जयंतीनिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शनिमंदिरनजीक झालेल्या या शिबिराला केएलई हॉस्पिटलच्या ब्लड सेंटर्सचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये एकूण 85 जणांनी रक्तदान केले. शनैश्चर मंडळाचे पदाधिकारी आणि केएलई ब्लड सेंटरचे डॉ. विठ्ठल माने आणि त्यांचे सहकारी यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. संकलित झालेले रक्त केएलई ब्लड सेंटरला देण्यात आले. सदर मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर घेत असून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.









