जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी बेळगावसह 11 जिल्हय़ात आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. बेळगावमध्ये विकेंड लॉकडाऊनही जाहीर करण्यात येत आहे. मागील शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याचप्रकारे येत्या शनिवार दि. 19 आणि रविवार दि. 20 रोजी कडक विकेंड लॉकडाऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जाहीर केला आहे.
विकेंड लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधे, दवाखाने, ऑनलाईन फूड्स सर्व्हिस, सरकारी अधिकारी, रेशन दुकाने (सकाळी 6 ते 10), रयत संपर्क केंद्रे (सकाळी 6 ते दुपारी 12) आदी अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. शेतकऱयांना साहित्य खरेदी करायचे असेल तर पीडीओ आणि तलाठी यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
किराणा मालासह इतर दुकाने बंद असणार आहेत. बेळगाव शहर व जिल्हय़ात रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी घटण्यास मदत होणार आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. आता रुग्णांची संख्या कमी होत आहे म्हणून कोणीही बेजबाबदारपणे फिरू नये. अन्यथा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.









