महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत निर्णय, -प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर विधान परिषद निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवडणूक नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथील मतदारांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. 13 नोव्हेंबरपासून तालुकानिहाय मतदारांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील शुक्रवारी कोल्हापुरात आले. त्यांनतर सायंकाळी पाच वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची कोल्हापूरात बैठक होऊन निवडणूक नियोजनाबाबत चर्चा झाली. भाजपचा उमेदवार ठरण्यापूर्वीच महाविकास आघाडीने प्रचाराचे नियोजन करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार पी एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार निवेदीता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, गोकुळचे संचालक डॉ सुजित मिणचेकर उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
जि.प.तील आजी, माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील आजी, माजी पदाधिकारी व प्रमुख जि.प.सदस्यांची शनिवारी बैठक होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.









