नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अजमेर ते दिल्ली शताब्दी एक्स्प्रेस टेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर घबराट पसरली. मंगळवारी रात्री 9.45 वाजता गुरुग्राम पोलीस नियंत्रण कक्षाला यासंबंधी कॉल आला. त्यानंतर लगेचच गुरुग्राम पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली. टेन थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगण्यात आले. रेल्वे पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने रात्री 11.40 वाजेपर्यंत गाडीत बॉम्बचा शोध घेण्यात आला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्यामुळे एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली. याबाबत तपास यंत्रणांकडून अफवा पसरवणाऱयाचा शोध घेतला जात आहे.









