सिडनीतील तिसरी कसोटी : ऑस्ट्रेलिया सर्वबाद 338, जडेजाचे 4 बळी
सिडनी / वृत्तसंस्था
स्टीव्ह स्मिथच्या (226 चेंडूत 131) झुंझार शतकानंतरही रवींद्र जडेजाचे 4 बळी व युवा फलंदाज शुभमन गिलच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथील तिसऱया कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी वर्चस्व गाजवण्यात यश प्राप्त केले. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा रचल्यानंतर भारताने दिवसअखेर 2 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली. चेतेश्वर पुजारा 9 तर कर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावांवर नाबाद राहिले.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या ‘डेक’वर विशेषतः जडेजा (4-62) व बुमराह (2-66) प्रभावी मारा करण्यात यशस्वी ठरले. शतकवीर स्मिथने मार्नस लाबुशानेसह (196 चेंडूत 91) संघाला 2 बाद 206 धावांपर्यंत नेत जणू 450 पेक्षा अधिक धावांच्या दिशेने महत्त्वाकांक्षी झेप घेऊन दिली होती. पण, या उभयतांचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज समयोचित साथ देऊ शकला नाही आणि यामुळे ऑस्ट्रेलियाला 106 षटकांच्या आत 338 धावांवर समाधान मानावे लागले. जडेजाने डीपवरुन बुलेट थ्रो करत स्मिथला धावचीत केले आणि इथे ऑस्ट्रेलियन डावाची सांगता झाली.
त्यानंतर संयमी व नियंत्रित खेळी साकारणाऱया शुभमन गिलचे तडफदार अर्धशतक भारताच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. शुभमनचे नॅथन लियॉन व पॅट कमिन्सला खेचलेले खणखणीत कव्हर ड्राईव्हचे फटके विशेष लक्षवेधी होते. शुभमन व रोहित (77 चेंडूत 26) या जोडीने 27 षटकात 70 धावांची सलामी दिली. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अजिंक्य रहाणे (40 चेंडूत नाबाद 5) व चेतेश्वर पुजारा (53 चेंडूत 9) यांना फलंदाजीसाठी नंदनवन ठरु पाहणाऱया खेळपट्टीवर पाय रोवण्यासाठी उत्तम व्यासपीठ तयार करुन दिले.

शुक्रवारी दिवसातील बराच काळ खेळपट्टी आच्छादित होती. पण, यानंतरही चेंडू स्विंग होत नव्हता आणि दव नसल्यामुळे चेंडूला फिरकीही मिळत नव्हती. भारताच्या डावात दोन महिन्यांनी प्रथमच खेळत असलेल्या रोहितने नेहमीच्या शैलीत सहज सुरुवात केली. तब्बल दोन तास तो उत्तम खेळला. मात्र, नंतर महत्त्वाकांक्षी ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात त्याने हॅझलवूडकडे परतीचा झेल दिला. रोहितच्या 77 चेंडूतील 26 धावांच्या खेळीत 3 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. अर्थात, शुभमन व रोहित यांनी जलद गोलंदाजांना पुलचे देखणे फटके लगावले. तसेच लियॉनच्या गोलंदाजीला सामोरे जाताना उत्तम फुटवर्कच्या बळावर वर्चस्व गाजवले. नंतर हे दोघेही ठरावीक अंतराने जरुर बाद झाले. पण, पहिल्या दोन कसोटीत संघाला जे शक्य झाले नव्हते, त्या भक्कम सलामीची भरपाई त्यांनी इथे जरुर केली.
दोन सत्रात ऑस्ट्रेलिया सरस
तत्पूर्वी, पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियाने केवळ 51 षटकातच 172 धावांची आतषबाजी करत उत्तम वर्चस्व गाजवले होते. स्मिथ, लाबुशानेसह तळाच्या स्थानावरील मिशेल स्टार्कच्या योगदानाचा (30 चेंडूत 24) प्राधान्याने समावेश राहिला. जडेजा व बुमराह दुसऱया नव्या चेंडूवर मात्र प्रभावी ठरले. फक्त अननुभवी नवदीप सैनीलाच (2-65) अधिक धावा मोजाव्या लागल्या. पहिल्या दोन दिवसात मंद गोलंदाजांना खेळपट्टीकडून फारशी मदत मिळाली नाही. पण, यानंतरही जडेजा लाबुशानेला शतकापासून रोखण्यात यशस्वी ठरला. किंचीत उसळलेल्या चेंडूवर लाबुशाने कटचा फटका लगावण्याच्या मोहात सापडला आणि पहिल्या स्लीपमध्ये रहाणेने अप्रतिम झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली.
अश्विनला अद्याप यश नाही
या मालिकेत प्रभावी ठरलेल्या अश्विनची पाटी मात्र कोरी राहिली. त्याने 24 षटकात एकही बळी न घेता 74 धावा दिल्या. रहाणेने लेगसाईडला उत्तम क्षेत्ररक्षण तैनात केले असले तरी स्मिथने स्टान्समध्ये बदल करत उत्तम वर्चस्व गाजवले. त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळेच ऑस्ट्रेलियाला 7 बाद 278 वरुन पुढील 11 षटकात 60 धावांची आतषबाजी करता आली होती.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : विल पुकोवस्की पायचीत गो. सैनी 62 (110 चेंडूत 4 चौकार), डेव्हिड वॉर्नर झे. पुजारा, गो. सिराज 5 (8 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. रहाणे, गो. जडेजा 91 (196 चेंडूत 11 चौकार), स्टीव्ह स्मिथ धावचीत (जडेजा) 131 (226 चेंडूत 16 चौकार), मॅथ्यू वेड झे. बुमराह, गो. जडेजा 13 (16 चेंडूत 2 चौकार), कॅमेरुन ग्रीन पायचीत गो. बुमराह 0 (21 चेंडू), टीम पेन त्रि. गो. बुमराह 1 (10 चेंडू), पॅट कमिन्स त्रि. गो. जडेजा 0 (13 चेंडू), मिशेल स्टार्क झे. शुभमन, गो. सैनी 24 (30 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नॅथन लियॉन पायचीत गो. जडेजा 0 (3 चेंडू), जोश हॅझलवूड नाबाद 1 (6 चेंडू). अवांतर 10. एकूण 105.4 षटकात सर्वबाद 338.
गडी बाद होण्याचा क्रम
1-6 (वॉर्नर, 3.3), 2-106 (पुकोवस्की, 34.2), 3-206 (लाबुशाने, 70.5), 4-232 (वेड, 76.5), 5-249 (ग्रीन, 84.5), 6-255 (पेन, 88.5), 7-278 (कमिन्स, 94.4), 8-310 (स्टार्क, 101.5), 9-315 (लियॉन, 102.4), 10-338 (स्टीव्ह स्मिथ, 105.4).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 25.4-7-66-2, मोहम्मद सिराज 25-4-67-1, रविचंद्रन अश्विन 24-1-74-0, नवदीप सैनी 13-0-65-2, रविंद्र जडेजा 18-3-62-4.
भारत पहिला डाव : रोहित शर्मा झे. व गो. हॅझलवूड 26 (77 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल झे. ग्रीन, गो. कमिन्स 50 (101 चेंडूत 8 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 9 (53 चेंडू), अजिंक्य रहाणे खेळत आहे 5 (40 चेंडू). अवांतर 6. एकूण 45 षटकात 2 बाद 96.
गडी बाद होण्याचा क्रम
1-70 (रोहित, 26.6), 2-85 (शुभमन, 32.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 7-4-19-0, जोश हॅझलवूड 10-5-23-1, पॅट कमिन्स 12-6-19-1, नॅथन लियॉन 16-7-35-0.
लाबुशानेचा शुभमनला सवाल….सचिन की विराट?

सिडनीत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचा इतिहास सचिनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि विराट पितृत्वाच्या रजेवर असला तरी त्याच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय सध्याचा भारतीय संघ पूर्ण होऊ शकत नाही. अर्थात, या उभयतांचा उल्लेख लाबुशानेने केला, ज्यावेळी शुभमन गिल क्रीझवर होता आणि स्वतः लाबुशाने फॉरवर्ड शॉर्ट लेगवर तैनात होता. लाबुशानेने यावेळी शुभमनला तुझा आवडता खेळाडू कोण, सचिन की विराट असा प्रश्न विचारला तर प्रत्युत्तरात शुभमनने हा सामना झाल्यानंतर त्याचे उत्तर देईन, असे नमूद केले. अर्थात, लाबुशाने इथे थांबला नाही आणि पुन्हा त्याने हाच प्रश्न त्याला विचारला. अगदी रोहित स्ट्राईकवर आल्यानंतर देखील लाबुशानेचा संवाद सुरुच होता. त्याने रोहितलाही विचारले, क्वारन्टाईनमध्ये तू काय करत होतास? रोहितने मात्र मौन राहणे पसंत केले.
ब्रॅडमननंतर स्मिथचा सर्वात जलद 27 शतकांचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सर्वात जलद 27 शतके पूर्ण करणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान संपादन केले. ब्रॅडमन यांनी 70 डावात 27 शतके झळकावली होती तर स्मिथने 136 डावात हा माईलस्टोन पार केला आहे. या निकषावर त्याने सचिन व विराट यांनाही मागे टाकले. या उभयतांनी 141 डावात हा पराक्रम गाजवला होता.
ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन, चौथी कसोटी अडचणीत
ब्रिस्बेन : क्विन्सलँडची राजधानी असलेल्या ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांचा नवा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यामुळे येथे होणाऱया भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याचे आयोजन अडचणीत आले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळे ब्रिस्बेनमधील सक्त क्वारन्टाईनच्या नियमात सवलत मिळावी, यासंदर्भात चर्चेत असताना हा लॉकडाऊन लागू केला गेला आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, उभय संघातील चौथी लढत दि. 15 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. ब्रिस्बेनमध्ये लढत होऊ शकत नसल्यास सिडनीमध्येच चौथी कसोटीही भरवली जाईल, असे सध्याचे संकेत आहेत.









