बदलत्या काळानुरूप बेळगावच्या पारंपरिक शिवजयंतीने घेतले व्यापक स्वरूप, भावनात्मक अस्मितेच्या जडणघडणीतही परंपरा कायम, बैलगाडा ते हलत्या देखाव्यापर्यंतची वाटचाल

सुशांत कुरंगी / बेळगाव
बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंतीला 100 वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगावात शिवजयंतीला सुरुवात झाली असली तरी भाषावार प्रांतरचनेनंतर व्यापक स्वरूप मिळाले. सीमावासियांच्या भावना, अस्मिता लोकांसमोर व्यक्त करण्यासाठी हे प्रमुख माध्यम ठरले. तेव्हापासून शिवजयंतीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. काळानुरूप यामध्ये बदल घडत गेला. 2004 नंतर मिरवणुकीमध्ये हलता देखावा दाखविण्यास सुरू झाल्यानंतर याची दखल देशभरात घेतली गेली. बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंतीचे यंदा 102 वे वर्ष आहे. शिवजयंतीचा शतकोत्तर प्रवास लक्षवेधी ठरणारा आहे.
बेळगावात शिवजयंती नेमकी केव्हा सुरू झाली याविषयी आजही ठोस माहिती उपलब्ध नाही. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 1919 मध्ये बेळगावमध्ये पहिली शिवजयंती साजरी झाली होती. मारुती मंदिर येथे अत्यंत साध्या पद्धतीने मराठा समाजातील व्यक्तींनी ही जयंती साजरी केली. पुढे शिवजयंतीचे स्वरूप वाढल्यानंतर झेंडा चौक परिसरात व्यापाऱयांनी एकत्रित येत शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.
सीमाप्रश्नामुळे मिळाले व्यापक स्वरूप
1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. अन्यायाने बेळगावसह इतर भाग म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याचा मोठा उदेक पुढील काही वर्षे सीमाभागात होत होता. त्यावेळी प्रशासनाकडून सरकारविरोधी कृतीवर कडक कारवाई केली जात होती. त्यामुळे लोकांपर्यंत आपली अस्मिता पोहोचविण्यासाठी शिवजयंती हा पर्याय दिसून आला. काढण्यात येणाऱया गाडय़ांमधून छोटे फलक लावून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली जात होती. त्याकाळी बेळगावच्या बसवाण्णा देवाची यात्रा व्यापक स्वरूपात भरविली जात होती. परंतु या यात्रेचे स्वरूप हळूहळू कमी होत गेले आणि शिवजयंतीचे स्वरूप वाढत गेले.
कुडची येथून आणले जात होते गाडे
शिवजयंतीचे स्वरूप हे पूर्वीपासूनच तीन दिवसांचे होते. तिसऱया दिवशी गाडे काढून शिवजयंतीची सांगता होत होती. कुडची येथील गाडा व बैलजोडय़ा शिवजयंतीमध्ये सहभागी होत गेल्या. त्यांच्या सोबतच बेळगाव परिसरातील बैलजोडय़ा शेकडोंच्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी होत गेल्या. बैलांसोबतच रेडेदेखील त्याकाळी जुंपले जात होते. त्याकाळी मारिहाळ परिसरातील रेडे गाडय़ांना जुंपले जात होते. सहभागी झालेल्या जनावरांच्या मालकांना पितळीची बादली भेट स्वरूपात दिली जात होती, अशी माहिती जाणकारांनी दिली. पारंपरिक सनईच्या आवाजात बेळगावच्या प्रमुख गल्ल्यांमधून शिवजयंतीची मिरवणूक थाटात निघत होती.
1978 नंतर बदलले स्वरूप
काळानुरूप बेळगावच्या शिवजयंतीचे स्वरूप बदलत गेले. 1978 नंतर बैलजोडय़ांऐवजी मिरवणुकीसाठी वाहनांचा वापर केला जाऊ लागला. त्यानंतर ट्रक्टर, ट्रक यांचा वापर वाढला. ही वाहने आल्यानंतर देखावे सादर करण्यास सुरुवात करण्यात आली.
गल्लीतील युवक आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून शिवकालीन देखावे सादर करीत होते. हे देखावे पाहण्यासाठी बेळगावसह आजूबाजूच्या खेडय़ातील लोकांचे थवे चालत शहराकडे येत असतं. हे लोक येतानाच आपल्यासोबत रात्रीच्या वेळचे जेवण घेऊन येत होते.
2004 नंतर सुरू झाले हलते देखावे
मध्यंतरीच्या काळात शिवजयंतीमध्ये काही विभत्स प्रकार सुरू झाले. मद्यप्राशन करून देखाव्यांमध्ये धुडघूस घातली जात होती. हा प्रकार शिवजयंती व मराठी माणसासाठी मारक ठरणार असल्याने काही शिवभक्तांनी एकत्रित येवून प्रत्येक मंडळांची बैठक घेतली. शिवचरित्रातील प्रसंग लिहून काढून ते लोकांच्यासमोर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. गल्लीतील कलाकारांना त्या-त्या व्यक्तीरेखेनुसार जबाबदारी नेमून देण्यात आली. चित्ररथ महामंडळाच्या माध्यमातून युवकांना पोषाख उपलब्ध करून देण्यात आले. नवीन प्रेरणा नेतृत्व असणारे कलाकार यामुळे पुढे आले. या युवकांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच बेळगावमध्ये प्रसंगानुरूप हलते देखावे सादर होऊ लागले. 2008 च्या काळात 73 ते 75 मंडळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित देखावे सादर करीत होती.
लोकमान्यमुळे शिवजयंतीला मिळाले विधायक स्वरूप
शिवजयंतीमध्ये अधिकाधिक चांगले चित्ररथ सहभागी व्हावेत, या उद्देशाने लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. 1985 च्या काळात टिळकवाडी सेवा संघाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 10 ते 12 वर्षे सेवा संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू होती. त्यानंतर लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. यामुळे मंडळांनी अधिकाधिक सरसपणे देखावे सादर करण्यास सुरुवात केली. यामुळे डॉल्बीच्या तालावर होणाऱया विभत्स प्रकाराला आळा बसला.
स्वातंत्र्यलढय़ासाठी शिवजयंती ठरली महत्त्वाची
स्वातंत्र्यपूर्व काळात झेंडा चौकात शिवजयंती साजरी होत होती. परंतु या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नरगुंदकर भावे चौक येथे ती साजरी करण्यास सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्यलढय़ात युवकांची फौज तयार करण्यामध्ये शिवजयंतीचे मोठे योगदान होते. त्यानंतर सीमालढय़ासाठी हे महत्त्वाचे माध्यम ठरले. माझ्या दोन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दित लाठी-काठी, लेझीम यासह इतर क्रीडा प्रकारांचे शिक्षण बेळगावमधील तरुणांना दिले जात होते, अशी आठवण किसन येळ्ळूरकर यांनी व्यक्त केली.
किसन येळ्ळूरकर -(माजी अध्यक्ष, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ)
चित्ररथांमुळे मिळाले वैभव
बेळगावमध्ये शिवजयंती साजरी होत होती, परंतु मध्यंतरीच्या काळात दंगामस्ती, दारू प्राशन करून छेड काढण्याचे प्रकार वाढले होते. हे विकृत प्रकार बंद करण्यासाठी प्रा. अनिल चौधरी, माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांनी प्रत्येक गल्लीवार बैठका घेऊन शिवाजी महाराजांची माहिती चित्ररथातून देण्याची संकल्पना मांडली. त्या काळात केवळ 23 चित्ररथ काढले जात होते. ते अवघ्या चार ते पाच वर्षांत 73 वर जाऊन पोहोचले. चित्ररथ मिरवणुकीमुळे बेळगावच्या शिवजयंतीला एक ऐतिहासिक वैभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
-शिवाजी गौंडाडकर (शिवप्रेमी)









