एखादी गोष्ट आपण अनुभवत असतो पण ती गोष्ट एखाद्या तज्ञ माणसाने खणखणीतपणे सांगितली तर पटते, खरी वाटते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी एका व्याख्यानात कोरोना हे या शंभर वर्षातील सर्वात मोठे संकट आहे असे म्हटले आणि होय असे संकट आम्ही यापूर्वी कधी बघितले नव्हते. अनुभवले नव्हते अशी चर्चा सुरू झाली. कोरोनामुळे लाखो लोक जीवाला मुकले, लाखो लोकांना बाधा झाली, अनेकांनी या आजाराची भीती घेतली. जगभर कोरोनाची दहशत माजली आहे. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत आणि धारावी झोपडपट्टीपासून मिलेनियम स्टार अमिताभ बच्चनच्या जलसा या निवासस्थानापर्यंत सर्वांना या विषाणूने भयभीत करून सोडले आहे. केवळ आजार, उपचार इतकाच या विषाणूचा तडाखा नाही या विषाणूने अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. स्थलांतर घडवले आहे. रोजगार घालवला आहे. उद्योग व्यवसाय अडचणीत आणले आहेत. गती प्रगतीचे चाक खोल रूतवून ठेवले आहे. अनेकांची भाकरी हिसकावून घेतली आहे. जानेवारी 2020 च्या प्रारंभी सुरू झालेली ही विषाणूची बाधा जुलै महिना उजाडला तरी थैमान घालते आहे. यावर इलाज, औषध व लस शोधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. भारतातही पुणे, हैद्राबाद येथे लस संशोधन अंतिम टप्प्यात आहे. प्राथमिक चाचण्या पूर्ण करून आता या लसीची मानवावर चाचणी सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनी या संदर्भात आनंदवार्ता येईल असे अंदाज आहेत. पण ही लस वा संसर्ग रोगावर औषध येऊन त्यांची भीती, दहशत संपायला आणि अर्थव्यवस्था पुन्हा सावरायला बराच काळ जाणार आहे. तोपर्यंत संयम, शिस्त आणि जबाबदारी घेऊन टिकून राहणे महत्त्वाचे आहे. यंदाचे वर्ष जीव जगला तरी खूप झाले असे रतन टाटांनी म्हटले आहे. टाटा केवळ असे म्हणून थांबलेले नाहीत तर त्यांनी आपली जबाबदारी, कर्तव्य आणि देशभक्ती याचे या संकटातही वस्तुपाठ घालून दिले आहेत. या संकटात उद्योगांना नफा, विस्तार यापेक्षा उद्योग, व्यवसाय, संस्था टिकवणे, वाचवणे, महत्त्वाचे ठरणार आहे. याचे भान सर्वसामान्य जनतेपासून उद्योगपतीपर्यंत आणि रोजंदार माणसापासून बडय़ा भांडवलदारापर्यंत सर्वांनी बाळगायला हवे. ज्या संस्था, बँका, व्यवसाय वर्षानुवर्षे फायद्यात चालल्या त्या संस्थांच्या, उद्योगांच्या जीवावर आपण मोठी संपत्ती मिळवली. तेथील कामगारांना आणि सर्वसामान्य माणसांना वाचवणे, सांभाळणे यांची आता गरज आहे. घरात कामाला येणारा स्वच्छता कामगार असो वा कार्यालयात, हॉटेलमध्ये, कारखान्यात काम करणारा नोकर असो त्याला जगवले पाहिजे. हा नवा आदर्शवाद प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. भले आम्ही हातात हात घेत नसू. तीन फुटाचे अंतर ठेवत असू पण, आम्ही एकमेकांना मनाने जोडले गेलो आहोत. एकमेकांना सहकार्य करणार आहोत. आणि हे संकट पार करून विजयी होणार आहोत असा निर्धार आणि कृती करायला हवी. त्यासाठी आमची आमच्या उद्योगाची बॅलन्सशीट तोटय़ात गेली तरी चालेल पण, माणुसकीचा झेंडा उंचावला पाहिजे. सोन्याचा दर 51 हजार रु. तोळा झाला आहे. हे अर्थव्यवस्थेचे थर्मामीटर आहे. जनसामान्य जगण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांना अर्धे पगारही मिळत नाहीत. कित्येकांच्या नोकऱया गेल्या आहेत. अनेकांना महानगरे सोडून गावाकडे यावे लागले आहे. शाळा, परीक्षा, प्रवास, आरोग्य, रोजगार अडचणीत आहे. अशावेळी देशातील टॉप शंभर भांडवलदारांनी, बँकांनी आणि उद्योगांनी प्रसंगी आम्ही जाणीवपूर्वक तोटय़ात राहू पण, आमच्या ग्राहकांना आणि देशबांधवांना वाचवू अशी भूमिका घेतली पाहिजे. शक्तिकांत दास यांनी या संकटात रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले आणि अनलॉक नंतर उद्योग व कंपन्यांकडून मिळत असलेले सहकार्य याचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. अनलॉकनंतर परिस्थिती सामान्य होऊ पाहते आहे. आर्थिक स्थिरता महत्त्वाची आहे वगैरे गोष्टी त्यांनी या व्हर्च्युअल माध्यमातून केलेल्या भाषणात व्यक्त केल्या. यामध्ये मोठा आशावाद दिसतो. आणि शेवटी माणूससुद्धा स्वप्नांवरच जगत असतो. हे संकट पार होणार, पुन्हा जग पूर्वपदावर येणार हे स्पष्ट आहे. पण शतकातले हे संकट व्यक्तिगत आपल्या जीवनाला, गावाला, देशाला, जगाला काय देऊन गेले आणि या संकटात मी कशी मानवता, माणुसकी जपली याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करायला हवे. लोकसेवेत असलेल्या अनेक संस्था, उद्योग, व्यवसाय आज बंद आहेत. एसटी, रेल्वे, विमान वाहतूक ठप्प आहे. पर्यटन, हॉटेलिंग, वाहतूक, वृत्तपत्रे असे अनेक व्यवसाय संकटात आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे आहे त्यांनी कर्तव्याने ज्यांच्याकडे नाही त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शतकातले मग कोणतेही संकट असो ते परतवून लावण्याची, पुन्हा उभारण्याची हिंमत आपण सारे दाखवू शकतो. कोरोना संकटाचा कितीही गडद अंधार असला तरी त्यावर सेवाभावाची आणि मानवतेची एखादी पणती प्रत्येकाने लावली तर निश्चितच हा काळोख संपेल. पुणे, पिंपरी, मुंबई, मालेगाव वगैरे शहरे भयग्रस्त अवस्थेत आहेत. कोरोना प्रादुर्भावाचा तेथील आकडा झोप उडवत आहे. याच जोडीला मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत नागरिकांनी नियम, शिस्त पाळून कोरोना आटोक्यात आणला आहे. धारावीचा हाच आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. अनलॉक सुरू असताना पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की येणार नाही याची काळजी त्या भागातील नागरिकांनी घेतली पाहिजे. आपला जीव, आपले कुटुंबीय आणि गाव, शहर वाचवणे ही प्रथम आपली जबाबदारी आहे, मग सरकार याचे भान हवे. दुर्दैवाने हे आज अनेकांना नाही. सर्वांनीच गांभिर्याने आणि निर्धाराने जाणीवपूर्वक वागले पाहिजे आणि कोरोनाला संपवून माणुसकी उंचावली पाहिजे.
Previous Articleमुन्नी क्वारंटिन झाली
Next Article बेळगाव शहरासह जिल्हय़ात 31 जणांना कोरोनाची बाधा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








