प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला. तसेच गुरुवारी सकाळी बाजारपेठेतील भाजी विपेत्यांचे मैदानावर स्थलांतर करण्याबरोबरच कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत होते. मात्र याचदरम्यान अचानकपणे पोलीस अधिकाऱयांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करून दडपशाहीने दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱयांना भाग पाडले आहे. त्यामुळे बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
कोरोनाबाधिताचा आकडा वाढत चालल्याने ंिचंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत पावणाऱयांची संख्या वाढत असून काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तसेच अलिकडे बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या नागरिकांना धोकादायक बनली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नाईट कर्फ्यू व विकेंड कर्फ्यूची घोषणा करून कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश बजावला. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून शहर आणि ग्रामीण भागात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी रात्री साडेसातपासून दुकाने बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
बुधवारपासून नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भाजी विपेत्यांचे खुल्या जागेत किंवा मैदानावर स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
त्यामुळे एपीएमसीमधील भाजी मार्केट शहरातील विविध भागात स्थलांतर करण्यासाठी महापालिका आयुक्तांसह एपीएमसी प्रशासन आणि पोलीस अधिकाऱयांची बैठक पार पडली. तसेच महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळपासून शहरातील भाजी विपेत्यांचे सरदार्स मैदान, संभाजी उद्यान, महात्मा फुले रोड अशा विविध ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले.
तसेच हॉटेल, बार, कॅन्टिनमध्ये नागरिकांची गर्दी वाढत असल्याने केवळ पार्सल सेवा देण्याची सूचना महापालिकेच्यावतीने गुरुवारी करण्यात आली. याबाबत रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, हुतात्मा चौक अशा बाजारपेठेतील विविध भागात महापालिकेच्या अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी आवाहन करण्यास प्रारंभ केला. माईकद्वारे आवाहन करून नियमावलीचे पालन करण्याची सूचना महापालिकेचे अधिकारी करीत होते. मात्र याच दरम्यान दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोलीस गस्तीच्या वाहनाद्वारे आणि काही पोलीस अधिकाऱयांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. औषध दुकाने, दुध विक्री केंदे, भाजी विपेते आदी दुकाने वगळता सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले.
कपडय़ाची दुकाने, मोबाईल शोरूम, पान शॉप, किराणा दुकान, सराफी दुकाने अशा सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी अचानकपणे दंडुकेशाही सुरू केली. त्यामुळे व्यवसायिक आणि बाजारपेठेत आलेल्या नागरिकांमध्ये गेंधळ माजला. पोलिसांनी अचानकपणे दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने संभ्रम निर्माण झाला. पोलिसांच्या दडपशाहीमुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना कुठे जायचे काहीच सुचले नाही. दररोज भाजीपाला, दुध व इतर साहित्य आणलेल्या कॅन्टिन व हॉटेल चालकांची मोठी गोची झाली.
अन्य दुकाने बंद करण्याचा आदेश
नाईट कर्फ्यू व विकेंड कर्फ्यूची घोषणा राज्य शासनाने केली असताना पोलीस लॉकडाऊन करीत आहेत का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नागरिक व व्यवसायिकामध्ये संभ्रम निर्माण झाल्याने काहीनी पोलीस अधिकाऱयांकडे विचारणा केली असता, जीवनाश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद करण्याचा आदेश शासनाने बजावला असल्याचे सांगून दुकाने बंद करण्याची सूचना केली. पूर्वसूचना न देता अचानपणे दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याने व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून सुरू करण्यात आली असताना दुसऱया दिवशी दिवसा दुकाने बंद करण्याची कारवाई करण्यात आली. तासाच्या अवधीत बाजारपेठेतील सर्व दुकानांचे शटर डाऊन करण्यात आले. पण पूर्वसूचना न देता केलेल्या कारवाईमुळे हॉटेल, कॅन्टिन चालकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पार्सल सेवा देण्याची घोषणा करून अचानकपणे दुकाने बंद करण्यास पार पाडण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
लॉकडाऊन करण्यात आल्याची अफवा
दुकाने बंद करण्याच्या कारवाईमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. त्यामुळे काही तळीरामांनी मद्य घेण्यासाठी मद्याच्या दुकानाकडे धाव घेतली. परिणामी काही दुकानांमध्ये गर्दी झाली होती. सामाजिक अंतर पाळण्याकडे दुर्लक्ष करून मद्य घेण्यासाठी गर्दी करण्यात आल्याचे दिसून आले. पण लॉकडाऊनच्या अफवेमुळे सर्वसामान्य नागरिकाचा गोंधळ उडाला. पण याबाबत प्रशासकीय अधिकाऱयांकडे चौकशी केली असता, काही दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने कारवाई करून दुकाने बंद करण्यात आली. नियमावलीचे पालन होत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलीस प्रशासनाने केली दुकाने बंद
कोरोना नियमावलीनुसार हॉटेल, बार, कॅन्टिनमध्ये नागरिकांना बसण्यास देवू नये, केवळ पार्सल सेवा देण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने गुरुवारी करण्यात येत होते. तसेच मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत असताना अचानक दुकाने बंद करण्याची सूचना पोलिसांनी केली. पण महापालिकेच्यावतीने दुकाने बंद करण्याची सूचना करण्यात आल्याची अफवा पसरली. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे चौकशी केली असता, केवळ कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेकडून याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शासनाने मंगळवारी बजावलेल्या आदेशाची अंमलबजावणी महापालिकेकडून करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सागितले.









