वृत्तसंस्था/ छत्तोग्राम
यजमान बांगलादेश आणि विंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसनच्या पुनरागमनामुळे बांगलादेशला अधिक मजबुती मिळेल, असा विश्वास कर्णधार मोमिनूल हकने व्यक्त केला आहे.
2019 च्या सप्टेंबरनंतर शकीब अल हसन पहिल्यांदा कसोटी सामना खेळत आहे. तत्पूर्वी मॅच फिक्सिंगप्रकरणात बुकींशी संपर्क केल्याने आयसीसीने शकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची (त्यापैकी एक वर्षाची निलंबित बंदी) कारवाई केली होती. शकीब अल हसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून गेल्या महिन्यात विंडीजविरूद्ध झालेल्या वनडे क्रिकेट मालिकेत त्याची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली होती. अष्टपैलू शकीबच्या पुनरागमनाने या कसोटी मालिकेत बांगलादेश संघ अधिक भक्कम झाल्याचे कर्णधार मोमिनूल हकने म्हटले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शकीबने फलंदाजीत 39.40 धावांची सरासरी तर गोलंदाजीत 31.12 धावांची सरासरी राखली आहे. विंडीजविरूद्ध 25 जानेवारी रोजी झालेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात शकीबला स्नायु दुखापत झाली होती पण बुधवारपासून सुरू होणाऱया कसोटी सामन्यासाठी तो निश्चित खेळेल, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक रस्सेल डॉम्निगो यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी संघाच्या सरावावेळी त्याने गोलंदाजीचा सराव केला. सदर मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत असून बांगलादेशला यापूर्वी भारत आणि पाक संघाकडून तीन पराभव पत्करावे लागले आहेत. या तिन्ही सामन्यात शकीबचा बांगलादेश संघात समावेश नव्हता. बांगलादेशने आपली शेवटची कसोटी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळली असून त्यामध्ये बांगलादेशने झिंबाब्वेचा डावाने पराभव केला होता. बांगलादेशच्या दौऱयासाठी विंडीज संघातील अनेक नेहमीचे खेळाडू उपलब्ध झालेले नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे कर्णधार होल्डर, शाय होप, हेतमेयर या मालिकेत खेळणार नाहीत. ही मालिका घरच्या मैदानावर होत असल्याने बांगलादेशचा संघ विंडीजवर विजय मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करेल.









