वृत्तसंस्था/ ढाका
बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखदार पुनरागमन करताना शकीब अल हसनने मिळविलेल्या 8 धावांतील चार बळींमुळे बांगलादेशने पहिल्या वनडे सामन्यात विंडीजवर 6 गडय़ांनी विजय मिळविला.
ऑक्टोबर 2019 पासून आयसीसीने शकीब हसनवर दोन वर्षांची बंदी घातली होती. त्यापैकी एक वर्षांची निलंबित बंदी होती. सट्टेबाजांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्याची माहिती आयसीसीला न दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्याच्या भेदक फिरकी माऱयापुढे विंडीजचा डाव 32.2 षटकांत 122 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 97 चेंडू बाकी ठेवत 4 बाद 125 धावा जमवित आरामात विजय मिळविला. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पदार्पणवीर हसन महमूद व वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान यांनी त्याला चांगली साथ देताना अनुक्रमे 28 धावांत 3 व 20 धावांत 2 बळी मिळविले.
बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने नाणेफेक जिंकल्यानंतर विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. पण पावसामुळे सुमारे तासभर खेळ थांबवावा लागला होता. विंडीज संघातून तब्बल सहा खेळाडूंनी वनडे पदार्पण केले आहे. 2019 विश्वचषकानंतर पहिलाच सामना खेळणाऱया शकीबने सलग सात षटके गोलंदाजी केली आणि विंडीजची मधली फळी कापून काढली. त्यांनी फक्त 11 धावांत 3 बळी गमविले. पदार्पणवीर काईल मेयर्स व रोवमन पॉवेल यांनी थोडाफार प्रतिकार करीत सहाव्या गडय़ासाठी 59 धावांची भर घातली. महमूदने पहिला बळी मिळविताना पॉवेलला 28 धावांवर बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रेमन रीफरला शून्यावर पायचीत केले. मेयर्सने सर्वाधिक 40 धावा जमविल्या.
तमिमचा हा कर्णधार या नात्याने पहिलाच सामना असून त्याने जोमदार सुरुवात करून देताना 44 धावा फटकावल्या. विंडीजचा कर्णधार जेसन मोहम्मदच्या गोलंदाजीवर तो यष्टिचीत झाला. लेगस्पिनर अकील हुसेनने तमिमचा साथीदार लिटन दासचा 14 धावांवर त्रिफळा उडविला. मुश्फिकुर रहीमने नाबाद 19 धावा जमवित बांगलादेशचा विजय साकार केला. विंडीजच्या अकील हुसेनने 26 धावांत 3 बळी मिळविले.
नऊ महिन्यांच्या कोरोना ब्रेकनंतर बांगलादेशचा हा पहिलाच सामना होता. आयसीसी वर्ल्ड सुपरलीगमधील ही मालिका असून. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी यातील संघ पात्र ठरणार आहेत. विंडीजच्या अनेक अव्वल खेळाडूंनी या दौऱयातून माघार घेतल्याने त्यांनी नवोदितांना संधी दिली आहे. उर्वरित दोन सामने शुक्रवारी व येत्या सोमवारी खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन कसोटींची मालिका उभय संघांत होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 32.2 षटकांत सर्व बाद 122 (काईल मेयर्स 40, पॉवेल 28, शकीब 4-8, हसन महमूद 3-28, मुस्तफिजुर रेहमान 2-20), बांगलादेश 33.5 षटकांत 4 बाद 125 (तमिम इक्बाल 44, शकीब 19, रहीम नाबाद 19, अवांतर 19, अकील हुसेन 3-26).









