शिवकथाकार विजयराव देशमुख यांची शिवकार्यातील पुढील संकल्प
कोल्हापूर / संजीव खाडे
आपल्या अमोघ वाणी आणि लेखनाने गेली साडेचार दशके शिवकाऱ्याचा वसा जोपसणाऱ्या शिवकथाकार विजयराव देशमुख यांचा ‘शककर्ते शिवराय’ हा व्दिखंडात्मक शिवचरित्र गंथ गाजला. गेल्या चाळीस वर्षांत या गंथाच्या तीसहजारहून अधिक प्रती शिवप्रेमींच्या घरी पोहचल्या. या ग्रंथाची हिंदी आवृत्तीही प्रकाशित झाली. आता इंग्रजी भाषेत हा गंथ जगभर पोहचविण्याच्या दृष्टीने विजयराव देशमुख आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख नियोजन सुरू केले आहे.
शिवचरित्रकार म्हणून विजयराव देशमुख यांची अखंड महाराष्ट्राला ओळख आहे. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शिवकार्याचा ज्ञानयज्ञ अखंड सुरू. दहाहजारहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली. 1974 मध्ये देशमुख यांनी विदर्भातून शिवदुर्ग दर्शन यात्रा सुरू केली. चैत्रप्रतिपदा गुढीपाडवा ते हनुमान जयंती पौर्णिमा अशा 15 दिवस यात्रा चालत असे. 1990 पर्यंत यात्रा सुरू राहिली. 1974 च्या पहिल्या यात्रेत स्वराज्याची राजधानी रायगडवर पोहल्यानंतर शिवरायांच्या समाधीपुढे बसले असताना देशमुख यांना शिवचरित्र लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यातून शिवरायवर ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी पैशाची गरज होती. क्राऊड फंडिंग अर्थात लोकठेव योजनेतून प्रत्येक शिवभक्ताकडून 1974 च्या काळात शंभर रूपये ठेव घेण्यात आली. गंथ पूर्ण झाल्यावर शंभरची ठेव व व्याजरूपाने शककर्ते शिवराय हा गंथ देण्याचे नियोजन झाले. ज्या काळी सोन्याचा दर पाचशे रूपये तोळा असा होता. तेव्हा साडेसातशे शिवभक्तांचे शंभर रूपये प्रमाणे 75 हजार रूपये संकलित झाले. गंथची निर्मिती करण्यासाठी देशमुख यांनी अभ्यास, संशोधन केले. त्यासाठी आग्रा, जिंजीपासून शिवरायांची पावले ज्या ठिकाणी पडली. त्या ठिकाणी जात माहिती घेतली. कुराण शरीफचाही अभ्यास केला. अभ्यासादरम्यान, राजस्थानातील जयपूरमध्ये शिवरायांच्या दोन कुंडल्या देशमुख यांना मिळाल्या. त्याआधारे त्यांनी शिवजयंतीचा वादही सोडविला. फाल्गुन वद्य तृतीय अर्थात 19 फेब्रुवारी 1630 ही महाराजांची जन्मतिथी आणि जन्मतारीख त्यांनी समप्रमाणात मांडली. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीची तिथी व तारीख पौष पौर्णिमा अर्थात 12 जानेवारी 1598 असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध केले. 1980 मध्ये शककर्ते शिवराय या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. 1982 मध्ये या ग्रंथाचा दुसरा खंड प्रकाशित केला. आजवर चार आवृत्ती प्रसिद्ध झाल्या असून तीसहजारहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. 1982 मध्ये जिजाऊंंचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथील लखुजी जाधव यांच्या गढीचा जीर्णोद्धार केला. 2016 मध्ये शककर्ते शिवराय ग्रंथाची ‘शक निर्माता शिवराय’ हिंदी आवृत्ती प्रसिद्ध केली. इंदोरच्या डॉ. मोहन बांडे यांनी या हिंदी ग्रंथाचा अनुवाद केला. देशमुख यांनी ‘राजा शंभू छत्रपती’ हे पुस्तकही राजमाता सुमित्राराजे यांच्या इच्छेनुसार लिहिले. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू कोरेगाव, तुळापूर येथील समाधीचा जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. 1982 पासून ते जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार सुरू केला. तो आता पर्यंत चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर व इतर मान्यवरांना देण्यात आला आहे.









