शिखरशिंगणापूर / वार्ताहर :
शिखरशिंगणापूर येथील शिवपार्वती विवाह सोहळा प्रतिवषी एक आकर्षण असते. मात्र, शासनादेशानुसार यात्रा उत्सव रद्द झाल्याने वऱ्हाडाविना शंभू महादेव लग्न सोहळा पार पाडला. ना भाविकांची गर्दी ना रंगीत ज्वारी अक्षतांची उधळण झाली, केवळ शिवपार्वती विवाह परंपरा पार पाडण्यात आली.
शनिवार दि 17 एप्रिल चैत्रशुद्ध पंचमी देवाच्या हळदीने उत्सवास प्रारंभ झाला. मंगळवार दि 20 रोजी दु 4 ध्वज बांधणी कार्यक्रम झाला तर भवानींउत्तपती योगावर रात्री 12,10 सुमहूर्तावर शिवपार्वती विवाह सोहळा पार पाडण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर शिंगणापूरमध्ये सर्वत्र कडक लॉकडाऊन आहे. केवळ उत्सवपरंपरा म्हणून नाममात्र विधी करण्यात येत आहेत. श्रीराम आरती करून राम जन्म साजरा करण्यात आला. शुक्रवारी 23 ला शिंगणापूर एकादशी मुख्य दिवस तर 24 द्वादशी आहे. मात्र, यंदा कवडी सोहळा संपन्न होणार नाही.
सोमवार 26 एप्रिल शिंगणापूर यात्रा उत्सवाचा सांगता दिवस आहे. दरम्यान पुढील शासन आदेश येईपर्यंत 30 एप्रिल अखेर सर्वत्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिंगणापूर देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाने कळवले आहे.









