विद्यार्थ्यांशी साधला संवाद; विनाकारण फिरणाऱ्या युवकांना दिली तंबी
प्रतिनिधी / सातारा :
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील कॉलेज परिसरात युवकांच्या टवाळक्या वाढल्या आहेत. महाविद्यालयीन युवकांच्या गटातटात मारामारीच्या घटना घडू लगल्या आहेत. युवतींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. त्या पार्श्वभुमीवर बुधवारी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुचाकीवरुन अचानकपणे कॉलेजच्या आवारात व्हिजिट दिली. कॉलेज परिसरात जावून महाविद्यालयीन युवतींना कोणाचा त्रास होतो काय?, पोलीस फिरतात का अशी विचारणा केली तर विनाकारण कॉलेजच्या आवारात आलेल्या युवकांना बरोबर गाठून त्यांनी सज्जड दमही भरला. दरम्यान, पोलिसांची मात्र यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.
सातारा शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. याच काळात काही टवाळखोर युवकांकडून वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. राडेबाजीच्या घटना घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी शंभूराज देसाई हे त्यांच्या यामाहा दुचाकीवरुन थेट कॉलेजच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांनी पोलिसांचा ताफा सोबत घेतला नव्हता. येथील स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या परिसरात त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणू घेतल्या. कॉलेजच्या बाहेर एक युवकांचा ग्रुप त्यांना दिसला त्या ग्रुपमध्ये जावून दोन बाहेरच्या कॉलेजच्या युवकांना कशासाठी आला आहे, आयडेंटी कुठं आहे अशी प्रश्नांची सरबत्ती करताच तेही विद्यार्थी क्षणभर चाचपडले. विनाकारण कॉलेज परिसरात फिरणाऱ्यांना सज्जड दम दिला.









