सांगली / विशेष प्रतिनिधी
नाट्य पंढरी सांगली येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारले आहे. शरद पवार यांनी स्व:ताच ट्विटर वरून ही माहिती दिली आहे.
पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, “आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी माझी भेट घेऊन यंदाच्या १०० व्या ऐतिहासिक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. कांबळी यांच्या विनंतीचा मी आनंदपूर्वक स्वीकार करीत आहे.” असे ट्विट केले आहे.
या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्षपद जब्बार पटेल यांना बहाल करण्यात आलेले आहे. यापूर्वी जाहीर कार्यक्रम नुसार २५ मार्च रोजी तंजावूर, तामिळनाडू येथे जाऊन संमेलन अध्यक्ष पटेल हे सर्फोजी राजे भोसले लिखित १९ आद्य मराठी नाट्य संहितांचे पूजन करतील. २६ मार्च रोजी सांगलीत विष्णुदास भावे यांच्या गौरवार्थ नाट्य दिंडी पार पाडली जाईल. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन आहे, त्यादिवशी सांगलीत नाट्य संमेलनाचे उद्घाटन होईल. हे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. २८ रोजी संमेलनाचा औपचारिक दुसरा दिवस असेल याशिवाय उत्साहाला लक्षात घेऊन २९ मार्च हा आणखी एक दिवस संमेलन वाढवले जाऊ शकते.