वृत्तसंस्था/ अहमदाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदाचा शंकरसिंग वाघेला यांनी राजीनामा दिला आहे. याचबरोबर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग केला आहे. यासंबंधीची माहिती देणारे पत्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना लिहिले आहे. sराष्ट्रवादीच्या प्रदेश प्रमुखपदी जयंत पटेल उर्फ बोस्की यांच्या नियुक्तीमुळे वाघेला नाराज झाले होते. पत्रात त्यांनी याच कारणाचा उल्लेख केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय सदस्य राहिलेल्या वाघेला यांनी भाजपमध्ये अनेक पदे भूषविली आहेत. 1995 मध्ये केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले असता वाघेला यांनी भाजपमध्ये बंड केले होते. तर 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर वाघेला यांना भाजपला रामराम ठोकला होता.
पूर्ण निष्ठा आणि स्वतःच्या क्षमतेसह, दीर्घ राजकीय अनुभव आणि पारदर्शक प्रणालीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यात पक्षाचा प्रमुख बदलण्यात आला आहे आणि या नव्या राजकीय स्थितंतरामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. ही स्थिती पाहता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे वाघेला यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाघेला यांनी 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीपूवीं जनविकास मोर्चा नावाने संघटना तयार केली होती. परंतु या संघटनेची निवडणूक आयोगात नोंदणी होऊ शकली नव्हती. या कारणामुळे त्यांनी अखिल भारतीय हिंदुस्थान काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर 95 उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यानंतर वाघेला यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.









