वृत्तसंस्था/ मुंबई
व्होडाफोन समूहाच्या भारतीय व्यवसायाला जवळपास 14.85 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याचे संकेत आहेत. या संदर्भातील अधिकृत माहिती ही ब्लूमबर्गच्या एक अहवालामधून दिली आहे. यामध्ये ऑकट्री कॅपिटल आणि वर्दे पार्टनर्स व्होडाफोन आयडियामध्ये गुंतवणूक करण्याचा अंदाज आहे. कंपनीमध्ये गुंतवणूक मिळण्याच्या बातमीने समभागांनी 4 टक्क्यांची तेजी प्राप्त केली होती.
गुंतवणूकदार व्होडाफोन आयडियामध्ये जवळपास 14.85 हजार कोटी ते 18.56 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने समभाग विक्री आणि कर्जाच्या आधारे 25.25 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे म्हटले होते. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ही योजना आखण्याची तयारी केली जात आहे.
दिलासा मिळण्याची शक्यता
मागील काही दिवसांपासून संकटाचा प्रवास करणारी व्होडाफोन आयडिया ही दूरसंचार कंपनी वेगवेगळी योजना आखण्यात गुंतली आहे. कारण मागील 9 तिमाहीमध्ये कंपनीला तोटय़ाचा सामना करावा लागला असून नवीन गुंतवणूकदारांची मदत घेत काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न कंपनी करणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.









