टॉवर कंपन्यांचे बिल देण्यास नाही रक्कम :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्होडाफोन समूह आणि आदित्य बिर्ला समूहाच्या व्होडाफोन आयडियाने दूरसंचार टॉवर कंपन्यांचे जून महिन्यातील रेंटल (भाडे) आणि एनर्जी वापराची रक्कम जमा करणे चुकवले आहे. आर्थिक अडचणीच्या कारणास्तव कंपनीने पैसे भरलेले नाहीत. खरंतर कंपनी महिन्याच्या 3 तारखेपर्यंत पैसे जमा करते, पण या महिन्यात पैसे भरण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. काही कोटींची बिले सर्व दूरसंचार कंपन्यांची भरली नसल्याची बाबही समोर आली आहे. यामुळे एक साखळी बाधीत होण्यासोबतच आम्हाला पुरवठादारांचेही पैसे जमा करावे लागतात, यामध्ये तेल कंपन्यांसह अन्य जणांचा समावेश असतो, असे टॉवर कंपन्यांपैकी एका अधिकाऱयाने सांगितले.
अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने कंपनीवर 54 हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात व्होडाफोन गुपने 73,313 कोटींचे नुकसान सहन केले आहे. त्यामुळे येत्या काळातही कंपनीची वाटचाल आणखी खोलात जाण्याची चिंता उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.









