नवीन आयटी नियमांचा प्रभाव ः 15 मे ते 15 जून या कालावधीत कारवाई
वृत्तसंस्था/ मुंबई
व्हॉट्सऍपने एका महिन्यात भारतीयांची जवळपास 20 लाख खाती बंद केली आहेत. सदरची कारवाई ही माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अंतर्गत नव्या नियमांच्या अधीन राहून केली असल्याची माहिती आहे. जी खाती बंद केली आहेत ती ऑटोमेटेड किंवा अवैध स्वरुपात सुरू होती आणि त्याअंतर्गत धोकादायक मेसेज पाठविण्याचे काम होत होते.
व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई साधारण 15 मे ते 15 जून का या कालावधीत करण्यात आली आहे. अशा पद्धतीने यापुढे प्रति महिना जागतिक पातळीवर कमीत कमी 80 लाख खाती बंद(बॅन)करण्यात येणार असल्याचे व्हॉट्सऍपने सांगितले असून त्यांना डिसेबल करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.
अटकाव घालण्यावर भर
व्हॉट्सऍपने आपल्या अहवालात म्हटले आहे, की आम्ही नकोशा मेसेजना अटकाव घालण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. ज्या खात्यातून मेसेज पाठवले जात आहेत तेथेच ते थांबवण्याची योजना आखण्यात येत आहे. यासाठी कंपनीची तज्ञांची टीम कार्यरत आहे. खात्यावर पाठविण्यात येणारी सर्व माहिती फिल्टर करण्यात येणार आहे.
भारत सर्वात मोठी बाजारपेठ
व्हॉट्सऍप ग्राहकांच्या संदर्भात भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये जळपास 53 कोटी ग्राहक आहेत, जे हे ऍप व सेवांचा वापर करत आहेत. मे मध्ये फेसबुकच्या या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सरकारच्या नवीन आयटी नियमांच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. व्हॉट्सऍपने याला विरोध केला होता.









