महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा : सून लूसची 21 चेंडूत 37 धावांची आतषबाजी निर्णायक
वृत्तसंस्था / शारजाह
महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेतील सलामीच्या लढतीत विद्यमान विजेत्या सुपरनोव्हाज संघाविरुद्ध प्रतिस्पर्धी व्हेलॉसिटीने 5 गडी राखून दमदार विजय संपादन केला. सुपरनोव्हाजने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 126 धावा केल्या तर प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीने 19.5 षटकात 5 बाद 129 धावांसह विजय संपादन केला.
सुपरनोव्हाजतर्फे चमारी अटापटूने 39 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 44 धावांची आतषबाजी केली आणि यामुळे सुपरनोव्हाजला सव्वाशेहे धावांचा टप्पा पार करता आला होता. कर्णधार हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले.
व्हेलॉसिटीच्या गोलंदाजांनी विशेषतः पॉवर प्लेमध्ये नियंत्रित, भेदक मारा केला आणि यामुळे सुपरनोव्हाजला 8 बाद 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. सर्वाधिक 44 धावा जमवणाऱया चमारीच्या खेळीत 2 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
व्हेलॉसिटीने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर सुपरनोव्हाजला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. प्रिया पुनिया (11) व चमारी अटापटू यांनी 5.2 षटकात 30 धावांची सलामी दिली. युवा जेमिमा रॉड्रिग्जला बिश्तने 7 धावांवर त्रिफळाचीत केले तर चमारी अटापटूने 12 व्या षटकात बाद होण्यापूर्वी संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने जलद 31 धावांचे योगदान दिले. अटापटू व हरमनप्रीत यांनी 47 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव कोलमडला. त्यांचे शेवटचे चार फलंदाज केवळ 15 धावांत बाद झाले.
प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीतर्फे सून लूसने 21 चेंडूत नाबाद 37 तर सुषमा वर्माने 33 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. वेदा कृष्णमूर्तीनेही 28 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक : सुपरनोव्हाज : 20 षटकात 8 बाद 126 (चमारी अटापटू 39 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 44, हरमनप्रीत कौर 27 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारासह 31, सिरिवर्दने 21 चेंडूत 1 चौकारासह 18, प्रिया पुनिया 15 चेंडूत 2 चौकारांसह 11. अवांतर 8. एकता बिश्त 4 षटकात 3-22, कॅस्पेरेक 2-23, जहानारा आलम 2-27).
व्हेलॉसिटी : 19.5 षटकात 5 बाद 129 (सून लूस 21 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 37, वेदा कृष्णमूर्ती 28 चेंडूत 29, सुषमा वर्मा 33 चेंडूत 34.)









