पर्यावरणप्रेमींचा इशारा : विकासाला विरोध नाही पण व्हॅक्सिन डेपोत नको
प्रतिनिधी / बेळगाव
पर्यावरणीयदृष्टय़ा बेळगावमध्ये सर्वात महत्त्वाच्या असणाऱया व्हॅक्सिन डेपोमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रकल्प नको आहेत. विकासाच्या नावावर या ठिकाणी कोणतीही वृक्षतोड होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी. जो काही विकास करायचा असेल तर तो व्हॅक्सिन डेपोच्या बाहेर करावा. यापूर्वीही व्हॅक्सिन डेपोच्या जैवविविधतेवर घाला घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. परंतु नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी तो उलथवून टाकला आहे. यावेळीही असा प्रकार झाल्यास त्याला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा बेळगावच्या पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
रविवारी व्हॅक्सिन डेपो येथे व्हॅक्सिन डेपोच्या रक्षणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन विरोध दर्शविला आहे. व्हॅक्सिन डेपो येथे स्मार्ट सिटीअंतर्गत एव्हिएशन गॅलरी उभारण्याचा विचार करण्यात येत आहे. व्हॅक्सिन डेपो हा नैसर्गिक अधिवासासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असताना या ठिकाणी एव्हिएशन गॅलरी उभारण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. यापेक्षा जी झाडे येथे नाहीत ती लावण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
फलक ठरताहेत लक्षवेधी
वाढत्या शहरीकरणामुळे बेळगाव शहरात सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालविण्यासाठी
व्हॅक्सिन डेपो ही एक महत्त्वाची जागा आहे. परंतु विकासासाठी यावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही, अशा आशयाचे फलक सध्या डेपोच्या परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे फलक नेमके कोणी लावले, अशी चर्चा सुरू झाली आहे.









