न्यायालयाचा आदेश पायदळी तुडविला : नागरिकांनी कर्मचाऱयांना पकडले रंगेहाथ
प्रतिनिधी /बेळगाव
व्हॅक्सिन डेपोमध्ये कोणतीही विकासकामे राबवू नये, असा आदेश बेंगळूरच्या उच्च न्यायालयाने बजावला आहे. या विकास कामांसंदर्भात पूर्ण स्थगिती दिली आहे. असे असताना सप्टेंबरमध्ये 93 हजार झाडांची लागवड करणार असल्याचे सांगून न्यायालयातून परवानगी घेण्यात आली होती. मात्र अद्याप एकही झाड न लावता चोरुन तेथील कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. यामुळे पर्यावरणप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
व्हॅक्सिन डेपोमधील झाडे तसेच औषधी वनस्पती नष्ट करण्याचा प्रकार सुरू आहे. व्हॅक्सिन डेपो हा बेळगावचा ऑक्सिजन डेपो आहे. तेथील झाडे तसेच इतर वनस्पतींचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे तेथील विकासकामे थांबविण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी या ठिकाणी आम्ही झाडे लावणार आहे, असे सांगून न्यायालयातून परवानगी घेतली.
पण झाडे लावण्याऐवजी तेथील अर्धवट कामे पूर्ण करुन तसेच इतर विकासकामे राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडविण्यात आला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. अनेक मॉर्निंग वॉकर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता सोमवार दि. 29 रोजी बेंगळूर येथे या खटल्याची सुनावणी असून स्मार्ट सिटीने केलेला न्यायालयाचा अवमान आणि नागरिकांची केलेली दिशाभूल ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणून दिली जाणार असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे.