चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी शनिवारी दुपारी व्ही. के भवरा यांची पंजाबचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच नरिंदर भार्गव यांना फिरोजपूरचे एसएसपी बनवण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी नव्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले. पंजाबचे प्रभारी डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय आणि फिरोजपूरचे एसएसपी हरमनदीप हंस यांना 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी शनिवारी हटवण्यात आले. या दोघांवरही पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या मोठय़ा त्रुटीचा ठपका ठेवला जाऊ शकतो. केंद्र सरकार या अधिकाऱयांवर थेट कारवाई करणार नसले तरी राज्य सरकारकडून डीजीपीला बडतर्फ करण्याची मागणी करू शकते किंवा त्यांना दिल्लीला बोलावण्याचा आदेश जारी करू शकते. त्यामुळेच निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.









