वृत्तसंस्था/ब्रिस्बेन
अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. सराव करताना दुखापत झाल्याने तिने मोसमातील या पहिल्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
दुखापतीतून बरे होण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नसले तरी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेआधी होणाऱया ऍडलेड इंटरनॅशनल स्पर्धेत खेळण्याबाबत तिने आशा व्यक्त केली आहे. ‘सरावावेळी झालेल्या अनपेक्षित दुखापतीमुळे दुर्दैवाने ब्रिस्बेनमध्ये मी नव्या मोसमाची सुरुवात करू शकणार नाही. पण ऑस्ट्रेलियात खेळणार असून ऍडलेडमध्ये आपण पुन्हा भेटू,’ असे 39 वर्षीय व्हीनस म्हणाली. या स्पर्धेत अव्वल महिलां टेनिसपटूंनी भाग घेतला असून अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका यांचा त्यात समावेश आहे. 6 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत असून व्हीनसच्या जागी दुसऱया खेळाडूची घोषणा गुरुवारी करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.









