ऑस्ट्रियातील तपास यंत्रणांकडून वेगवान कारवाई : स्वीत्झर्लंडच्या झ्यूरिचमध्येही एक दहशतवादी जेरबंद
वृत्तसंस्था / व्हिएन्ना
ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जणांना जीव गमवावा लागला असून 22 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत 14 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपींनी व्हिएन्नाच्या रस्त्यांवर गोळीबार करणाऱया दहशतवाद्याला मदत केली होती. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
बंदुकधारी दहशतवाद्याची ओळख पटली असून तो 20 वर्षीय कुज्तिम फेजुलाई असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर ऑस्ट्रियाचाच रहिवासी असून अटक करण्यात आलेल्यांमध्येही कुणी विदेशी असल्याची माहिती समोर आलेली नाही. संबंधित हल्लेखोर नॉर्थ मेसोडेनियाचा रहिवासी आहे, व्हिएन्नामध्ये अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला कित्येक वर्षांनी झाला आहे. ऑस्ट्रियात झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्येही धार्मिक स्थळे आणि शाळांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
आम्ही आमच्या परंपरा आणि जीवनपद्धतीचे कुठल्याही स्थितीत रक्षण करू. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो आणि ती कुठल्याही स्थितीत वाचवू. या हल्ल्यामागील गुन्हेगारांना हुडकून काढून त्यांना लवकरात लवकर शिक्षा करणार आहोत. या घटनेशी देणंघेणं असलेल्या कुणालाच मोकळं सोडणार नसल्याचे ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सेबेस्टियन कुर्ज यांनी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. स्वीस पोलिसांनी झ्यूरिचनजीक एका व्यक्तीला अटक केली आहे, तो ऑस्ट्रियातील दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रिटन-फ्रान्समध्ये अतिदक्षता
ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्यासंबंधी मंगळवारी दक्षतेची पातळी वाढविण्यात आली आहे. यानुसार तेथे हल्ल्याची शक्यता खूपच अधिक आहे. मागील आठवडय़ात फ्रान्स तसेच चालू आठवडय़ात ऑस्ट्रियात झालेल्या हल्ल्यानंतर उचललेले हे खबरदारीचे पाऊल असल्याचे ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या लोकांनी चिंतित नव्हे तर सतर्क रहायला हवे. देशातील पोलिसांचे अस्तित्व स्पष्ट स्वरुपात दिसणार आहे. ब्रिटनमध्ये आम्ही वास्तविक आणि गंभीर धोक्याला सामोरे जात आहोत, असे पटेल म्हणाल्या.









