जाहीर प्रचारावरच अधिक भर देण्याचा विचार : बिडेन यांनी घेतला ट्रम्प यांचा ‘समाचार’
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून 15 ऑक्टोबर रोजी होणाऱया व्हर्च्युअल वादविवाद चर्चेत आपण सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेटने 15 ऑक्टोबर रोजी मियामी येथे पार पडणारी वादविवाद चर्चा व्हर्च्युअली घेण्याचा निर्णय घेतला
आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवस उपचार घेऊन ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत 15 ऑक्टोबर रोजी होणाऱया वादविवाद चर्चेत आपण सहभागी होणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. कोरोना संसर्गामुळे ट्रम्प यांच्या वादविवादामधील सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, आता ते ठिकठाक झाले आहेत. त्यांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
तरीही देशातील कोरोना संसर्गामुळे डिबेटमध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार रिमोट लोकेशनहून सहभागी होतील, असे गुरुवारी कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेटकडून सांगण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी आपण यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले. “आयोगाने वादविवाद चर्चेची पद्धत बदलल्यामुळे आम्ही ती स्वीकारणार नाही. मी त्यांना (जो. बायडेन) यांना पहिल्या चर्चेत पराभूत केले
होते.
दुसऱया चर्चेतही सहजरित्या मी त्यांना पराभूत करू शकतो. मात्र, आता व्हर्च्युअल वादविवाद चर्चेत मी वेळ घालवू इच्छित नाही,’’ असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या स्पष्टोक्तीनंतर जो बायडेन यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “आयोगाने दिलेला सल्ला आम्ही मानतो. आम्हाला माहित नाही राष्ट्राध्यक्ष पुढे काय करतील. प्रत्येक सेकंदाला त्यांचे मन बदलत असते. अशा परिस्थितीत मी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे उचित नाही’’ असे बायडेन म्हणाले.
ट्रम्प यांच्या प्रचारसभांना डॉक्टरांकडून अनुमती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारपासून सार्वजनिक सभांना उपस्थिती लावणार आहेत. व्हाईट हाऊसमधील डॉक्टरांनी त्यांना सभांसाठी परवानगी दिली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कोरोनासंदर्भातील औषधांचा कोर्स पूर्ण केला असल्याने आता तो पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांमध्ये वावरू शकतात, असे डॉक्टरांनी यासंदर्भातील घोषणा करताना सांगितले. मागील गुरुवारपासून उद्याच्या शनिवारपर्यंतचा कालावधी हा दहा दिवसांचा आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण टीमने त्यांच्यावर योग्य उपचार केले असून त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. आता ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी तीन दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेतले. त्यांनी उपचारांनाही चांगला प्रतिसाद दिला. इलाज सुरु असताना त्यांच्या शरीरावर औषधांचा कोणताच विपरित परिणाम दिसून आला नाही. तसेच ट्रम्प यांना औषधांची ऍलर्जी झाल्याचेही काही लक्षण दिसून आले नाही, असे त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सीन कोनली यांनी सांगितले. मागील आठवडय़ात ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. दोघांवरही दहा दिवसात यशस्वी उपचार करण्यात आले.