प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील नांदिवली व व्याहाळी गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ६० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी नळपाणी योजना कामाच्या भूमिपूजनप्रसंगी दिली. या नळपाणी योजनेमुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमचीच मिटणार असल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.
नांदिवली – केळेवाडी, देऊळवाडी, बौध्दवाडी व व्याहाळी या गावांना वर्षानुवर्ष पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेवून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत शासनाकडून मंजूरी घेत सततच्या पाठपुराव्यानंतर ६० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या नळपाणी योजनेचे काम एप्रिल – मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार योगेश कदम यांनी ठेकेदारास दिले आहे.
नांदिवली पंचक्रोशीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. असे अभिवचन देत माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही दिली. सहकाराच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी स्वयंरोजगार लघुउद्योग उभारण्यावर भर देणार असल्याचेही शेवटी सांगितले. यावेळी आमदार योगेश कदम यांचा नांदिवली, व्याहाळी, चाटव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नांदिवलीचे माजी सरपंच दगडू सुतार, विठ्ठल कदम यांच्यासह सुरेश कदम , योगेश कदम , जनार्दन सुतार, चंद्रकांत सकपाळ, अनंत कदम, अनंत तुकाराम कदम, संतोष कदम, विश्वास कदम, भगवान सुतार, अनंत सुतार, धोंडू कदम, पुष्पा कदम, जयश्री सुतार, कुंदा कदम, सुमित कदम, गणेश शिर्के, विकास सुतार आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचा आमदार कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य अरूण कदम, पालघरचे सेना जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, राजेंद्र शेलार, विश्वास कदम, रामचंद्र आईनकर आदी उपस्थित होते.
Previous Articleसातारा : लॉकडाऊनमध्ये युवक शोधताहेत इतिहासाच्या पाऊलखुणा
Next Article उत्तर कर्नाटकात पुन्हा पूर









