घरगुती गॅससह पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडर दरात 17 रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली नसल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात गेल्या महिन्यात दोनदा वाढ करण्यात आली होती. गेल्या महिन्यात या दरात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 1,349 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी 15 डिसेंबरला या किमती 13,32 रुपये होत्या. त्यामुळे एका सिलिंडरमागे 17 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅम सिलिंडरचे दर सध्या वेगवेगळय़ा शहरांमध्ये 700 रुपयांच्या आसपास आहेत.
दर महिन्याला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दराचा आढावा घेत त्यात बदल करण्यात येतात. प्रत्येक राज्यातील कर वेगवेगळे असल्याने प्रत्येक राज्यात सिलिंडरच्या दरात बदल होतात. तसेच तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल- डिझेलच्या किंमतीच्या आढावा घेत त्यात बदल करण्यात येतात. शुक्रवारी सलग पंचविसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीपासून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90.34 रुपये तर डिझलचे दर 80.51 रुपये आहेत.









