111 गाळय़ांसाठी 7 ते 13 ऑक्टोबर दरम्यान महालिलाव
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या माध्यमातून महसूल मिळतो. पण शहरातील गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आल्याने नव्याने भाडेकराराने देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 111 गाळे भाडेकराराने देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले भाजीमार्केटमधील 59 गाळय़ांसाठी फेर लिलाव होणार आहे.
महापालिकेच्या मालकीचे व्यापारी संकुल असून 440 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र काही गाळय़ांच्या कराराची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. तसेच काही ठिकाणी नव्याने गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. कसाई गल्ली येथील फिश मार्केट आणि कोनवाळ गल्लीतील मटण मार्केट, सरदार मैदानावरील क्रीडासंकुलातील व्यापारी गाळे, महात्मा फुले मार्केट, जुना धारवाड रोड स्क्रॅप मार्केट, अनगोळ नाका व महापालिका जुने कार्यालय आवारातील क्यापारी गाळय़ांचा समावेश आहे. फिश मार्केटची इमारत नव्याने बांधण्यात आली असून येथील 8 गाळय़ांचा आणि महात्मा फुले भाजीमार्केटमधील 59 गाळय़ांचा फेर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. तसेच कसाई गल्लीमधील कत्तलखाना व बकऱयांचे शेड भाडय़ाने देण्यात येणार आहे. तसेच कोनवाळ गल्ली येथील कत्तलखाना व बकऱयाचे शेड भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नेहरूनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी नव्याने 14 गाळे उभारण्यात आले आहेत. यापैकी एका गाळय़ाचा लिलाव यापूर्वी करण्यात आला होता. तसेच शहर व उपनगरात स्मार्ट बसथांब्याची उभारणी करण्यात आली असून, ठिकठिकाणी सहा बाय आठ फूट आकाराचे दहा किओस्क गाळे उभारण्यात आले आहेत. हे गाळे देखील 12 वर्षाच्या भाडेकराराने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लिलाव आयोजित करण्यात आला आहे. सरदार मैदानावर गॅलरी येथील चार गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. दि. 7 ऑक्टोबरपासून लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार असून सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात चालणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी गाळय़ांची अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
तारीख | गाळय़ांच्या तपशील |
7 ऑक्टोबर | नेहरूनगर येथील 13 गाळे. |
स्मार्ट बसथांब्यावरील 10 किओस्क गाळय़ांचा लिलाव | |
8 ऑक्टोबर | नवबागवेस, खासबाग व्यापारी संकुलातील 3 गाळे व 1 हॉल |
अनगोळ रोड नाका व्यापारी संकुलातील 2 गाळे | |
अनगोळ नाका येथील पहिल्या मजल्यावरील 2 हॉल | |
11 ऑक्टोबर | जुना धारवाड रोड व महात्मा फुले मार्केटमधील गाळे |
कसाई गल्ली व कोनवाळ गल्लीतील कत्तलखाना आणि बकरी शेड | |
12 ऑक्टोबर | महात्मा फुले भाजीमार्केटमधील 62 गाळे आणि 2 गोडाऊन |
13 ऑक्टोबर | सरदार हायस्कूल मैदानाशेजारी 4 गाळे |
महानगरपालिका जुन्या कार्यालय आवारातील 1 गाळा |