दारु, ड्रग्ज, तंबाखू इत्यादींचे व्यसन जडले, की ते सुटता सुटत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. साहजिकच व्यसन सोडविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात असेही दिसून येते. वैज्ञानिक यावर विविध उपाययोजना करीत आहेत. सहज, सोप्या मार्गाने आणि शरिराला फारसा त्रास न होता, व्यसनांपासून सुटका कशी करता येईल, यावर अनेक प्रयोग सुरु असून आपल्या शरिरातच व्यसन मुक्तीची काही नैसर्गिक यंत्रणा आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
या संशोधनात यश येईल अशी आशा निर्माण झाली आहे. कारण, मानवी पेशींमध्ये संशोधकांना एक ‘मॉलेक्युलर स्विच’ आढळला असून तो नशेसंबंधीचे व्यवहार नियंत्रित करतो, असे दिसून आले आहे. अंमली पदार्थांची शरिरावरील प्रतिक्रिया किती तीव्र असेल हे सुद्धा या स्विचच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते, असे आढळले आहे. साहजिकच या स्विचच्या अधिक अभ्यासाअंती व्यसन सोडविण्याचा उपाय सापडू शकेल असा विश्वास संशोधकांना वाटतो. हा स्विच वास्तवात एक प्रथिन (प्रोटीन) आहे, जे पेशींमध्ये असते. त्याला एनपीएएस 4 असे तांत्रिक नाव आहे ते मज्जा पेशींमध्ये असून या पेशींची संरचना आणि कार्य यांचे नियंत्रण करते. अंमली पदार्थांचा परिणाम या मज्जा पेशींवरच होत असतो. त्यामुळे या प्रथिनाची क्षमता सुधारल्यास व्यसनांपासून मुक्ती मिळणे शक्य होईल, असा यामागचा तर्क आहे, असे सांगण्यात येते. विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्याने या प्रथिनाची नशा नियंत्रण क्षमता वाढते असेही आढळले आहे. यावर अधिक संशोधन झाल्यास व्यसनमुक्तीचा रामबाण उपाय हाती लागू शकेल, असे सध्यातरी चित्र असून अधिक संशोधन केले जात आहे.