प्राचीन काळी घोडय़ांचा वापर खूप मोठय़ा प्रमाणात केला जायचा. राजा-महाराजांपासून ते अगदी सामान्यांपर्यंत घोडय़ांचा वापर केला जाई. घोडा हा प्राणी त्याकाळी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला होता. त्या काळातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता.
त्याच कालावधीत, एका छोटय़ा राज्याचा राजा होता. राजाचे राज्य लहान असल्याने तेथील प्रजेची लोकसंख्या खूप कमी होती. राजाला स्वतःचे राज्य वाढवायचे होते. राज्याचा विस्तार करायचा होता. राजा आणि त्याची प्रजाही खूप कष्टाळू, प्रामाणिक आणि पराक्रमी होते. प्रजेचीही ईच्छा राज्याचा विस्तार व्हावा अशीच होती.
राजाने एकेदिवशी मंत्रीसभा बोलावली. त्यात त्याने सर्व मंत्र्यांना राज्यविस्ताराविषयी विचारले. त्यावर सगळय़ांचे असे मत होते की, आपण सुरुवातीला राज्यातील सत्पुरुषांना ह्याविषयी विचारावे. त्यांचा सल्ला घ्यावा आणि मगच पुढे जावे.
त्यानुसार सुरुवातीला राज्यातील सत्पुरुष शोधण्यास प्रारंभ झाला. राज्याच्या चारही दिशांना सैनिकांना पाठवण्यात आले आणि सत्पुरुष शोधून काढण्यास सांगितले. ह्या प्रकल्पात अनेक दिवस वाया गेलेत. पण योग्य सत्पुरुष काही केल्या सापडेना.
शेवटी राजाने राज्यविस्तार करायचे ठरवले. त्यानुसार, राजाने शेजारील राज्यांना मांडलिक होण्याचे सांगितले. तसे पत्र इतर राज्यांना पाठवण्यात आले. परंतु, इतर राज्यातील राजांनी ह्यास विरोध केला. शेवटी नाईलाजाने युद्धाची वेळ येऊन ठेपली.
राजाने सैनिकांना युद्धास सज्ज राहण्यास सांगितले. सैनिकांनी युद्धाचा सराव करण्यास प्रारंभ केला. गुप्तहेरांनी शेजारच्या राज्यातील बातम्या राजापर्यंत पोहोचवण्यास प्रारंभ केला. संपूर्ण सैन्य, सेनापती, राजा आणि प्रजा युद्धासाठी तयार झाली. युद्धाला प्रारंभ झाला. पण काही ठिकाणी राजाला यश आले तर काही ठिकाणी अपयश आले.
एके दिवशी राजाला भेटायला एक संन्यासी राजगृहात आलेत. राजाने त्यांचा यथोचित मान-सन्मान केला. राजाने त्यांना वस्त्र, सोने, चांदी, धनराशी दिली. परंतु, त्या संन्यासीने ते सगळे नाकारले. राजाने त्यांना त्याच्या युद्धमोहिमेविषयी विचारले. संन्यास्याने राजाला त्याच्या रथाचे सात घोडे मोकळे सोडण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने तसे केले. पुढे राजाला त्यांनी त्या सातही घोडय़ांची शर्यत लावण्यास सांगितली. राजाने त्या सातही घोडय़ांची शर्यत लावली.
त्या शर्यतीत राजाला असे जाणवले की, प्रत्येक घोडय़ाची शक्ती, त्या घोडय़ाची धावण्याची क्षमता वेगवेगळी आहे. परंतु, जेव्हा हे सातही घोडे रथाला बांधलेले असतात त्यावेळी मात्र त्यांची शक्ती आणि धावण्याची क्षमता एकसमान असते. त्यांच्यात सुसूत्रता असते. ही गोष्ट राजाने संन्यास्याला सांगितली. त्यावेळी संन्यास्याने राजाला शरीरातील पंचेंद्रिय, मन आणि बुद्धी ह्यांना एकाच सूत्रात बांधण्यास सांगितले. म्हणजेच मनावर बुद्धीचा ताबा ठेवण्यास सांगितले आणि बुद्धीवर मनाचा ताबा ठेवण्यास सांगितले.
आपले पंचेंद्रिय, मन आणि बुद्धी हे मोकळे सोडल्यास, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यास आयुष्यात यशप्राप्ती आणि समाधान मिळू शकत नाही. ही गोष्ट संन्यास्याने राजास पटवून दिली. राजाला ह्या गोष्टीचे महत्व पटले आणि काही कालावधीनंतर राजा चक्रवर्ती सम्राट बनला.
व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा कायमस्वरूपी यशप्राप्ती आणि समाधान मिळेलच असे नाही. त्याकरिता प्रत्येक औद्योगिक संस्थेतील किंवा उद्योग समूहातील कामगार, कर्मचारी, पर्यवेक्षक, कनि÷-वरि÷ अधिकारी, मालक आणि व्यवस्थापक ह्यांनी स्वतःच्या मनाचा ताबा हा आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला द्यावा आणि नेटाने कार्य करावे.
व्यवस्थापनशास्त्राच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे श्रीसमर्थांच्या श्रीमददासबोध ग्रंथातील तत्वज्ञान होय! ह्याकरिता सुरुवातीलाच श्रीसमर्थ संपूर्ण मानवसमूहाला उद्देशून असे म्हणतात की,
“ग्रंथा नाम दासबोध।गुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्गे ।।01/01/02’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. ह्यात गुरू-शिष्यांच्या संवादरूपाने भक्तिमार्ग सांगितला आहे.
पुढे श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“नाना संमती अन्वये।म्हणौनि मिथ्या म्हणतां नये ।तथापि हे अनुभवासि ये। प्रत्यक्ष आतां।।01/01/16’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
अनेक शास्त्र,वेद-उपनिषदांच्या आधारे आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचितीच्या स्वानुभवाने हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे ह्यास मिथ्या किंवा असत्य म्हणू नये. साधकांना तसेच प्रत्येक मनुष्याला श्रीमददासबोध ग्रंथ वाचणे किती महत्वाचे आहे हे श्रीसमर्थ पुढील ओळींद्वारे स्पष्ट करत आहे. श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“भगवद्वचनीं अविश्वासे।ऐसा कोण पतित असे।
भगवद्वाक्मयावरहीत नसे ।बोलणें येथीचें।।
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमानी । मत्सरें करी।।01/01/21-22’’
ह्याचा अर्थ असा आहे की, भगवद्वचनांवर विश्वास नाही असा कोणीही मनुष्य सहसा नसतो. ह्या ग्रंथात भगवदवाक्मयाशिवाय काहीही सांगितलेले नाही. म्हणून पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय जो उगीचच त्या ग्रंथाला नावे ठेवतो तो मत्सर करणारा, दुरात्मा आणि दुराभिमानी असतो.
त्यानंतर, श्रीमददासबोध ग्रंथाच्या श्रवणाने, वाचनाने, मनाने आणि चिंतनाने प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कसे बदल घडून येतात ह्याविषयी श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“आतां श्रवण केलियाचें फळ। क्रिया पालटे तात्काळ ।
तुटे संशयाचे मूळ ।येकसरा ।।
नासे अज्ञान दुःख भ्रांती। शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथी ।।01/01/28-30’’
ह्याचा अर्थ असा आहे की, दासबोधाच्या अभ्यासाने वागण्यात, वृत्तीत बदल घडून येतो. मनांतील संशय दूर होऊन खरा मार्ग सापडतो. अज्ञान, दुःख आणि खोटय़ा समजुती ह्यांचा संपूर्ण नाश होऊन ज्ञानप्राप्ती होते. ही ह्या ग्रंथाची फलश्रुती आहे. व्यवस्थापनक्षेत्रातील सर्वांनीच, व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणाऱयांनी आणि प्रत्येक मनुष्याने श्रीसमर्थ रामदास स्वामींचा श्रीमददासबोध ग्रंथ सातत्याने वाचावा. त्याद्वारे ज्ञानप्राप्ती करवून घ्यावी, श्रीसमर्थांची कृपा आणि प्रभूश्रीरामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त करावा हीच वाचकांना नम्र विनंती.
– माधव श्रीकांत किल्लेदार








