आपल्या समृद्ध आणि संपन्न मराठी भाषेत ‘टोला’, ‘तडाखा’ आणि ‘फटकारा’ हे शब्द अनेकवेळा वापरले जातात. मराठी भाषेतील अनेक शब्दांना किंवा वाक्मयांना दोन अर्थ प्राप्त झालेले आहेत. त्यापैकीच हे तीन शब्द आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक पद्धतीने ह्या शब्दांचा वापर होतो. ह्या शब्दांनाच इंग्रजीमध्ये एऊRध्ख्Sिं असे म्हणतात. व्यवस्थापन शास्त्रात अभिप्रेरणा हे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण असून त्यात ह्या सकारात्मक तडाख्यांद्वारेच कार्य सिद्धीस नेले जाते. कुठल्याही व्यक्तीस सकारात्मक फटकारा दिला गेला तर त्या व्यक्तीत अपेक्षित बदल होऊन त्या व्यक्तीचे जीवन बदलू शकते. पण त्याऐवजी जर नकारात्मक तडाखा दिला गेला तर मात्र त्या व्यक्तीचे खच्चीकरण होऊन ती व्यक्ती नैराश्येच्या गर्तेत जाऊ शकते. ज्याला किंवा जिला उत्तम व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने सकारात्मक पद्धतीने आपल्या उद्योगसंस्थेतील कर्मचारी आणि कामगारांना फटकारे देणे गरजेचे असते म्हणजे सतत त्यांना अभिप्रेरणा देऊन प्रोत्साहित करणे आवश्यक असते. कोणत्याही व्यापार उद्योग संस्थेतील विविध पातळीवर कार्य करणाऱया कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यावर त्या संस्थेचे यश मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असते. केवळ संस्थेचे व्यवस्थापन उत्तम आणि उत्पादन सामग्री उच्च दर्जाची असून चालत नाही, तर तेथील कर्मचाऱयांची मानसिकता ही काम करण्याची असणे गरजेचे असते. जर कामगार किंवा कर्मचाऱयांना कामात फारशी रुची नसेल तर ती उद्योगसंस्था योग्य प्रकारे कार्य करू शकणार नाही. पर्यायाने समाजात ती उद्योगसंस्था म्हणावी तसे नाव मिळवू शकणार नाही. कर्मचारी, कामगार आणि व्यवस्थापक ह्यांनी स्वतःचे काम मन लावून केले तर उत्तम दर्जाचे व्यवस्थापन निर्माण होऊ शकते. त्याकरिता कर्मचारी व्यवस्थापकाला पद्धतशीर प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर्मचाऱयांनी स्वतःचे काम स्वेच्छेने आणि मन लावून केल्यास उद्योग संस्थेची गुणवत्ता वाढून त्याचा चांगला परिणाम उत्पादन क्षमतेवर होऊ शकतो. प्रत्येक कार्यात व्यवस्थापकाने औद्योगिक समूहातील वातावरण कार्यासाठी अनुकूल करणे आवश्यक असते. त्याकरिता कठोर परिश्रम आणि सकारात्मक तडाख्यांद्वारे कामगार/कर्मचारी ह्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे असते. अशाप्रकारची मानसिकता निर्माण करणे ह्या प्रक्रियेला अभिप्रेरणा असे म्हणतात. जर व्यवसाय संस्थेतील बहुसंख्य कर्मचारी हे अभिप्रेरीत असतील तर त्यांच्यातील कार्य करण्याच्या उत्साहात वाढ होऊन कार्याप्रती असलेली त्यांची तत्परता वाढून संस्थेप्रती नि÷ा वृद्धिंगत होते. त्यामुळे व्यवसायाचे उत्पादन उच्च दर्जाचे राहून संपूर्ण व्यवसायाची एकूण उत्पादकता वाढते. परंतु या सर्व अभिप्रेरणा प्रकियेत व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. असा उत्तम व्यवस्थापक कसा असावा ह्याविषयी श्रीसमर्थांनी दासबोधात म्हटले आहे की,
प्रपंची जाणे राजकारण !
परमार्थी साकल्यविवरण !
सर्वांमध्ये उत्तम गुण !
त्याचा भोक्ता !
मागें येक पुढे येक !
ऐसा कदापि नाहीं दंडक !
सर्वत्रांसी अलौकिक !
त्या पुरुषाची !! 19/04/17-18
म्हणजे, महंत हा प्रपंच आणि राजकारण उत्तम रीतीने जाणतो. तसेच पारमार्थिक ग्रंथांचेसुद्धा त्यांचे वाचन असते. जे जे चांगले गुण आहेत ते तो शिकतो. कोणाच्या तोंडावर एक आणि मागे एक हे त्याचे बोलणे नसते. तो दुतोंडा नसतो. या गुणांमुळेच तो सगळीकडे अलौकिक ठरतो.
समर्थांनी सांगितलेला हा महंत म्हणजेच व्यवस्थापन शास्त्रातील उत्तम व्यवस्थापक होय! अशा उत्तम व्यवस्थापकास व्यवहारचातुर्य असते आणि उद्योगसंस्थेतील प्रत्येक गोष्ट त्याला ठाऊक असते. त्याचे व्यवस्थापकीय ज्ञानही प्रचंड असते. जे जे चांगले आहे ते ते तो इतरांकडून शिकण्याचा प्रयास करतो. त्याचे बोलणे आणि वागणे हे दुटप्पी नसते. त्यामुळे असा व्यवस्थापक हा सर्वांनाच प्रिय
असतो.
उत्तम व्यवस्थापक हा स्वयंप्रेरित असतो त्यामुळे तो कामगार/कर्मचाऱयांना अभिप्रेरीत करू शकतो. व्यवस्थापकांना त्याच्या/तिच्या सहकाऱयांच्या मदतीने अपेक्षित उद्दिष्टय़े साध्य करावयाची असतात. दुसऱयाकडून अपेक्षित काम करवून घेणे म्हणजेच व्यवस्थापन! आपल्या सोबत असलेल्या सहकाऱयांना केवळ कामाचे आणि जबाबदारीचे वाटप करून उद्दिष्टय़ पूर्ण होत नाही. उद्दिष्ट साध्य करण्याची उत्कट इच्छा सहकाऱयांमध्ये निर्माण करणे म्हणजेच उत्तम व्यवस्थापन करणे होय! ह्या प्रक्रियेलाच अभिप्रेरणा असे म्हणतात. मानवाला ईश्वराने विवेकशक्ती ही देणगी दिलेली आहे. त्यावरून चांगले आणि वाईट ठरवण्याचे सामर्थ्य मनुष्यास प्राप्त झाले आहे. अनेकवेळा संस्थेतील कर्मचारी/कामगार हे भौतिकदृष्टीने त्यांचे अस्तित्व सिद्ध करतात पण मानसिक दृष्टीने ते कामाच्या ठिकाणी हजर नसतात. त्यामुळे दुश्चित्त होऊन त्यांचे कार्य बिघडते. अशावेळी त्यांना आवश्यकता असते ती उत्तम व्यवस्थापकाची आणि योग्य प्रोत्साहनाची! म्हणूनच उद्योगसंस्थेतील कर्मचाऱयांनी/कामगारांनी स्वतःची कार्यक्षमता प्रत्येक कार्यात स्वयंप्रेरणेने वापरावी आणि स्वतःसहित इतरांचाही उत्कर्ष करावा. कर्मचारी आणि कामगारांना स्वयंप्रेरित बनवणारा व्यवस्थापक कसा असतो याविषयी श्रीसमर्थ दासबोधात सांगतात की,
संगतीचें मनुष्य पालटे!
उत्तम गुण तत्काळ उठे!
अखंड अभ्यासी लगटे!
समुदाव!!
जेथें जेथें नित्य नवा!
जनासी वाटे हा असावा !
परंतु लालचीचा गोवा !
पडोंची नेदी !! 19/06/20-21
म्हणजे, महंताच्या संगतीने मनुष्य बदलतो. दुर्गुणी असलेला मनुष्य सद्गुणी बनतो. महंताच्या प्रभावाने सामान्य लोकही अभ्यासू बनतात. हा महंत जेथे जेथे जातो तेथे तेथे लोक त्याचे नव्याने स्वागत करतात. महंत हा निस्पृह असल्याने तो लोकांच्या मोहाला बळी पडत नाही.
ह्यानुसार जो उत्तम व्यवस्थापक असतो त्याच्या संगतीने कर्मचारी आणि कामगारांमध्ये बदल घडतात. जे दुर्गुणी असतात ते सद्गुणी बनतात. त्यांना उत्तम व्यवस्थापकाच्या प्रभावाने उद्योग संस्थेविषयी तळमळ निर्माण होऊन ते ज्ञानी बनतात. त्यांची संस्थेप्रती असलेली नि÷ा वाढते. असा उत्तम व्यवस्थापक हा औद्योगिक संस्थेतील ज्या ज्या ठिकाणी जातो तेथील कामगार/कर्मचारी त्याचे मनापासून स्वागत करतात. परंतु तो/ती स्वतःच्या लोकप्रियतेला बळी न पडताच सातत्याने औद्योगिक संस्थेतील कर्मचारी आणि व्यवस्थापकांना अभिप्रेरीत करीत असतात. आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रातील रतन टाटा आणि नारायण मूर्ती – सुधा मूर्ती हे असेच उत्तम व्यवस्थापक आहेत. श्री समर्थांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ते निस्पृह महंत आहेत.
माधव किल्लेदार








