लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
व्यवसाय परवाना तपासणी मोहिमेमुळे सर्वच व्यावसायिक खडबडून जागे झाले आहेत. मात्र नूतनीकरणासाठी दंड आकारणी करण्यात येत असल्याने व्यावसायिकांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे कोरोना कालावधीतील 1 वर्षाचा व्यवसाय परवाना शुल्क माफ करावा, अशा मागणीचे निवेदन शहर क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने महापालिका आरोग्य अधिकाऱयांना दिले.
शहरातील सर्रास व्यावसायिकांकडे व्यवसाय परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱयांना संपर्क साधून व्यवसाय परवाने नूतनीकरण करून घेण्याची सूचना आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केली आहे. त्यामुळे विविध संघटना व्यवसाय परवाना घेण्यासाठी पुढे येत आहेत. शहरातील
क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने देखील याकरिता पुढाकार घेतला आहे. मात्र नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षाचा व्यवसाय परवाना शुल्क भरणे बंधनकारक आहे. चार ते पाच वर्षांपासून व्यवसाय परवाना नूतनीकरण केले नसलेल्या व्यावसायिकांना या शुल्काचा बोजा होत आहे. तसेच व्यवसाय परवाना शुल्कात सूट देण्याची तरतूद महापालिकेच्या कायद्यात नाही. पण कोरोना कालावधीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय बंद करून बसावे लागले आहेत. तसेच लॉकडाऊननंतरही व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नूतनीकरणासाठी दंड आकारणी करण्यात येत असल्याने व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. कोरोना कालावधीतील व्यवसाय परवाना शुल्काची रक्कम माफ करावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. डुमगोळ यांच्याकडे केले. शुल्क माफ करण्याची तरतूद मनपाच्या कायद्यात नाही. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन डॉ. डुमगोळ यांनी निवेदन स्वीकारून दिले. यावेळी क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









