कोरोना संदेश : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ज्या संख्येने वाढत आहेत, ती बाब गंभीर आहे. प्रारंभीच्या काळात परजिल्हय़ातून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडत होत्या. पण आता स्थानिक नागरिकांना संसर्ग होताना दिसत आहे. हळूहळू परिस्थिती गंभीर बनते आहे. शहरातील काही भाग अतिजोखिमग्रस्त बनत चालले आहेत. अशावेळी आपण सर्वांनी एकजुटीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. शहरातील गंजी माळ, वारे वसाहत, जवाहर नगर, ताराबाई पार्कसह इतर भागात रूग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. जर तुम्ही एखादी केस घेऊन निरीक्षण केल्यास पॉझिटिव्ह रूग्ण हा विवाह, वाढदिवस, अंत्यसंस्कार अथवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर बाधित झाल्याचे निष्कर्ष पुढे येतात. याचाच अर्थ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नये, गर्दी असणारे कार्यक्रम टाळावेत. कोणतेही काम असो, प्रत्यक्ष व्यक्तीगत उपस्थिती दाखवून संवाद साधणे टाळता येते. आज मोबाईल, व्हॉटस्अप सारखी संवादाची प्रभावी साधने आहेत. त्याचा वापर संवादासाठी, कामासाठी करा. शहरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मात्र कोणतीही लक्षणे अथवा त्रास नसलेल्यांना होम क्वॉरंटाईन करून वैद्यकीय सल्ला व उपचार देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. ऍन्टिजेंट टेस्ट लवकरच आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सुरू होतील. शहरातील खासगी डॉक्टरची साथ देत आहेत. सध्या आपण लॉकडाऊन कडक पाळत आहोत. उद्या लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक सर्व नियम पाळा. आपणच नव्हे तर आपले कुटुंबीय महत्वाचे आहेत. स्वतःला रिस्क म्हणजे कुटुंबीयांना रिस्क हे लक्षात ठेवा. कोरानाबरोबर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या तापाचे आजार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी एकजुटीने साथीच्या रोगाविरोधात लढुया. या लढ्यात कोरोना हरेल, कोल्हापूरकर जिंकतील, असा विश्वास आहे.
शब्दांकन : संजीव खाडे, कोल्हापूर








