वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू कर्णधार स्टीव्ह वॉ आणि त्याचा भाऊ मार्क वॉ यांनी ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या गडय़ासाठी 464 धावांच्या भागिदारीचा विक्रम 1990 साली केला होता पण व्हिक्टोरिया संघाकडून खेळणाऱया विल पुकोव्हस्की आणि मार्पूस हॅरीस यांनी सलामीच्या गडय़ासाठी विक्रमी 486 धावांची भागिदारी करताना वैयक्तिक द्विशतके झळकविली.
शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यातील रविवारी झालेल्या सामन्यात व्हिक्टोरियाच्या पुकोव्हस्की आणि हॅरीस यांनी सलामीच्या गडय़ासाठी 486 धावांची विक्रमी भागिदारी करत वॉ बंधूंचा विक्रम मोडीत काढला. वॉ बंधूनी न्यू साऊथ वेल्स संघाकडून 1990 साली 464 धावांच्या भागिदारीचा विक्रम नोंदविला होता. रविवारच्या सामन्यात हॅरीसने 239 धावा जमविल्या असून पुकोव्हस्की 255 धावांवर नाबाद राहिला. व्हिक्टोरिया संघाचा कर्णधार हॅण्डस्कॉबने आपल्या संघाचा डाव 3 बाद 564 धावांवर घोषित केला. 2019 च्या ऍशेस मालिकेनंतर हॅरीसने एकही कसोटी खेळलेली नाही.









