सिडनीतील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शिलेदारांनी प्रतिस्पर्ध्याला दिलेली कडवी झुंज म्हणजे एखादा अनिर्णित सामनाही किती कसदार असू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. जायबंदी असतानाही ऋषभ पंत, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन यांच्यासारख्या खेळाडूंनी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर अभेद्य पहाडासारखे दाखविलेले धैर्य हे विजयापेक्षा कांकणभर सरसच ठरते. पहिल्या कसोटीत 36 धावांत झालेला खुर्दा, त्यानंतर दुसऱया कसोटीत अजिंक्य रहाणेच्या शैलीदार खेळाच्या जोरावर टीम इंडियाने घेतलेली फिनिक्स भरारी नि आता प्रतिकूल परिस्थितीतील चिकाटी हा भारतीय खेळ अधिक प्रगल्भ होत असल्याचेच द्योतक होय. याचे श्रेय टीमवर्कलाच जाते, हे निःसंशय. तरीदेखील अंतिम दिवशी चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, हनुमा विहारी व आर. अश्विन यांनी ज्याप्रकारे कामगिरी केली, ती बिनतोडच म्हटली पाहिजे. कठीण प्रसंगात दडपण झुगारत नैसर्गिक खेळ कसा खेळायचा, याचे पंतने घडविलेले दर्शन त्याच्यातील समज वाढल्याचेच दर्शविते. पंतचा मूळ पिंड हा आक्रमक खेळाडूचा. तो कायम ठेवत ‘आक्रमण हाच संरक्षणाचा उत्तम उपाय,’ हे ध्यानात घेऊन त्याने मुक्तपणे फलंदाजी केल्याचे फळ त्याला मिळाले. शतकाच्या उंबरठय़ावर असताना त्याने थोडे सबुरीने घेतले असते, तर बरे झाले असते, असे त्याच्या चाहत्यांना वाटले असणार. परंतु, सेहवागी परंपरेच्या खेळाडूकडून अशा अपेक्षा फिजूल ठरतात. 100, 200 वा 300 च्या उंबरठय़ावर असताना उत्तुंग षटकार ठोकणारा सेहवाग असो वा आजचा स्फोटक पंत. त्यांच्या शैलीत फरक असेल, वृत्तीत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू देणे, श्रेयस्कर. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली त्याला असा उपजत खेळ करण्याची मोकळीक मिळाली नि पंतने त्याचे सोने केले, हे नक्की. त्याचे वय, अनुभव पाहता भविष्यात त्याला आपला खेळ आणखी उंचावण्याची निश्चितच संधी असेल. हनुमा विहारीची खेळी हनुमानउडीपेक्षा कमी नाही. लंकादहनाने जसे रावणाचे सुवर्णराज्य उद्ध्वस्त झाले, तसेच हनुमाच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाच्या चेहऱयावरचे ‘स्मित’ कुठल्या कुठे पळाले, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. तशी कसोटीत एका शतकासह चार अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. परंतु, शेवटच्या दिवशी तब्बल 161 चेंडूंचा सामना करीत त्याने धीरोदात्तपणे नोंदविलेल्या नाबाद 23 धावा या अधिक लक्षवेधक नि मौल्यवान ठरतात. मांडीचा स्नायू दुखावलेला असतानाही पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, हेझलवूड या तोफखान्याला तो ज्या पद्धतीने पुरून उरला, यातूनच लढणे म्हणजे काय असते, हे समजून घेता येईल. त्यामुळे क्रिकेटचे आकलन नसणाऱया कुणी त्याला क्रिकेटचे मारेकरी ठरविले असले, तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. उलटपक्षी अश्विनने ‘शतकाच्या तोडीची खेळी,’ असे हनुमाच्या योगदानाचे केलेले वर्णन सार्थ म्हणावयास हवे. विहारीसोबत अश्विनचा खेळही तितकाच उच्च दर्जाचा व प्रेरणादायी म्हणता येईल. कारण या दोघांच्या भागिदारीनेच भारतीयांची संक्रांत गोड केली. क्रिकेट धुरिण वा नेतृत्वासाठी अश्विन हा फारसा लाडका नसला, तरी क्लास म्हणजे काय असते, हे त्याने आपल्या गोलंदाजी, फलंदाजीतून नेहमीच दाखवून दिले आहे. त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाकरिता कशी डोकेदुखी ठरली, त्यावर कांगारूंना कसा पुनः पुन्हा अभ्यास करावा लागला, हे साऱयांनीच पाहिले असेल. अर्थात फलंदाजीतही टिच्चून उभे राहणे म्हणजे काय असते, हाही त्याने घालून दिलेला वस्तुपाठ असाच अभ्यासनीय. वाकून बुटाची लेसही बांधता येऊ नये अशी पाठदुखी त्याला सतावत होती. म्हणूनच 128 चेंडूतील त्याच्या 39 धावा यादेखील शतकापेक्षा कमी ठरत नाहीत. कसोटी कारकिर्दीत 377 बळी, चार शतकांसह 11 अर्धशतके हे वास्तविक अष्टपैलूत्वाचेच गमक. जखमी जडेजानेही आपली चिकाटी व उपयुक्तता दोन्ही आघाडय़ांवर या खेपेलाही सिद्ध केली आहे. त्यामुळे या दोघांकडे चांगले अष्टपैलू म्हणून पहायला हरकत नसावी. शुभमन गिल हा भारतीय क्रिकेटला गवसलेला आणखी एक तारा. त्याच्यातही अफाट गुणवत्ता आहे. आपले स्थान ध्रुवासारखे अढळ करायचे असेल, तर त्याला सातत्य ठेवावे लागेल. पुजाराच्या फलंदाजीत द्रविडसारखे पदलालित्य वा नजाकत नसली, तरी नांगर टाकण्याचा मि. डिपेंडेबलचा वारसा तो निश्चितपणे चालवतो आहे. या कसोटीतील त्याच्या 77 धावा निर्णायक म्हणाव्या लागतील. संघात उशिरा दाखल झाल्यानंतरही परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने केलेली सुरुवातही आश्वासक. संघातील एकेक मोहरे जायबंदी होत असतानादेखील खचून न जाता अजिंक्य रहाणेने दाखविलेले नेतृत्व कौशल्य त्याच्यातील लढाऊ बाणा, धीरगंभीरपणावर प्रकाश टाकते. दुसऱया कसोटीप्रमाणे सिडनीत त्याची फलंदाजी बहरली नसेल. पण, पंतला बढती देण्याचा निर्णय टर्निंग पॉईंट ठरला, हे मान्य करावे लागते. संयतपणा, शांत डोके ठेवतानाच सर्वांशी समरसत संघातील जिगरबाज वृत्ती जागवण्याची रहाणेनी केली किमया बघता आधीचे यश हा योगायोग ठरत नाही. माजी कर्णधार राहुल द्रविडच्या वाढदिवशी अजिंक्यच्या संघाने त्यांना ही सुरेख भेट दिली असल्याचे आयसीसीचे उद्गारही समर्पकच आहेत. क्रिकेटविश्वात राहुल द्रविड हा ‘द वॉल’ नावाने ओळखला जात असे. असाच ‘वॉल गेम’ टीम इंडियाकडून व्हावा, हे आनंददायीच. ऑस्ट्रेलिया दौऱयात जायबंदी खेळाडूंची संख्या आठ, नऊवर जाणे विचार करायला लावणारे आहे. आता चौथा सामना कसोटीचा असेल. दुसरीकडे मोहम्मद सिराजला प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागणे, हे खिलाडूवृत्ती व माणूसपणाचे लक्षण नाही. वॉर्नरने प्रेक्षकांच्या वतीने माफी मागितली असली, तरी अशांना अद्दल घडावी. सभ्य माणसांच्या या खेळात सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन नको. क्रेकेटमधून निर्भेळ आनंद मिळावा, हीच अपेक्षा.
Previous Articleआजोबा आणि नातू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








