वृत्तसंस्था/ लंडन
वॉर्विकशायर क्रिकेट क्लबने शुक्रवारी लॉर्ड्स मैदानावर बॉब विलिस करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात वॉर्विकशायरने लँकेशायरचा 1 डाव आणि 199 धावांनी दणदणीत पराभव करून विलीस चषकावर आपले नाव कोरले.
गेल्या आठवडय़ामध्ये वॉर्विकशायर संघाने इंग्लीश कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविले होते. चार दिवसांच्या कालावधीत वॉर्विकशायरने मिळविलेले हे दुसरे विजेतेपद आहे. वॉर्विकशायर आणि लँकेशायर यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात वॉर्विकशायरने पहिल्या डावात 518 धावांचा डोंगर उभा केला. वॉर्विकशायरतर्फे कर्णधार विल ऱहोड्सने 156 धावांचे योगदान दिले. सलामीच्या रॉब एट्सने शानदार शतक झळकविले. त्यानंतर लँकेशायरचा पहिला डाव केवळ 78 धावांत आटोपला. त्यामुळे त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱया डावात त्यांच्याकडून फारसा प्रतिकार होऊ शकला नाही. 6 बाद 171 या धावसंख्येवरून त्यांनी शुक्रवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 4 गडी लवकर बाद झाले. वॉर्विकशायरच्या पेग मिल्सने 28 धावांत 5 गडी बाद केले.









