ना नकाशा, ना आराखडा ; नागरिकांचा उडाला गोंधळ वॉर्ड पुनर्रचनेबाबत अर्धवट माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून जिल्हाधिकाऱयांनी अधिसूचना जारी केल्यापासून 15 दिवसांत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, 2018 च्या पुनर्रचनेत कोणताच बदल न करता थेट आरक्षण जाहीर करण्यात आल्याने वॉर्ड पुनर्रचनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने दिलेली माहिती अपूर्ण असल्याने वॉर्ड रचनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच संपूर्ण वॉर्ड फोडण्यात आले असून वॉर्ड क्रमांकही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.
प्रलंबित असलेल्या राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांची निवडणूक घेण्यासाठी राज्य शासनाने तयारी चालविली आहे. यापूर्वीच
वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली असून याबाबतचा थांगपत्ता शहरवासियांना नाही. जून 2017 मध्ये वॉर्ड पुनर्रचना प्रक्रिया राबविण्यात आली होती. जुलै महिन्यात अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली होती. पण वॉर्ड रचनेबाबत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून हरकती घेण्यात आल्या नाहीत. अंतिम अधिसूचनाही महापालिका कार्यालयात उपलब्ध नव्हती. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यानंतर याबाबत माजी नगरसेवकांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. सदर वॉर्ड पुनर्रचना आणि वॉर्ड आरक्षण रद्द करण्याची मागणी धारवाड उच्च न्यायालयात करण्यात आली होती. वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याने रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याने सदर वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण मागे घेऊन नव्याने जाहीर करण्याचे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने जाहीर केले होते. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण बदलण्याची सूचना सप्टेंबर 2019 मध्ये न्यायालयाने केली होती. पण
वॉर्ड पुनर्रचना करण्यापूर्वीच आता थेट वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. सदर आरक्षण जुन्या वॉर्ड रचनेनुसार झाले असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अर्धवट माहितीमुळे गोंधळ वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले, त्यासोबत वॉर्डची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. पण केवळ वॉर्डची हद्द कुठून सुरू होते व कुठे संपते इतकीच माहिती असल्याने वॉर्डची माहिती नागरिकांना लक्षात येत नाही. महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या हद्दीसोबत आराखडा प्रसिद्ध करणे आवश्यक होते.









